मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीवरून सत्ताधारी महायुतीत बेबवान निर्माण झाला आहे. भाजपने तीन उमेदवार जाहीर केले असले तरी पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा शिवसेना शिंदे गटाने केली. दुसरीकडे, मतांचे गणित जुळविण्यासाठी भाजप व काँग्रेसने शिक्षणसम्राटांची मुलगी वा सुनेला रिंगणात उतरविले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपने ‘पुढारी’ वृत्तपत्राचे मालक व मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांची स्नूषा व डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे संचालक पी. डी. पाटील यांची मुलगी डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने माजी मंत्री व ‘श्री शिवाजी शिक्षण संस्थे’चे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांची कन्या तर ‘देशन्नोती’ वृत्तपत्राचे मालक प्रकाश पोहरे यांची सून प्रा. आदिती पोहरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही शिक्षणसम्राटांच्या मुलींना शिक्षण संस्थेतील मतदार डोळ्यांसमोर ठेवूनच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपकडे अनेक इच्छुक होते. पण पक्षात अधिकृतपणे प्रवेश करण्यापूर्वीच स्मिता जाधव यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यावर जाधव यांचा भाजप प्रवेश झाला. पुणे पदवीधर मतदारसंघात डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेतील शिक्षकांची मतदार म्हणून मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली आहे.
भाजप तीन जागा लढणार
भाजपने पाचपैकी तीन मतदारसंघांत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. औरंगाबाद पदवीधर हा राष्ट्रवादी अजित पवार गट तर अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेना शिंदे गटासाठी सोडला आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे महायुतीत नाराजी पसरली. पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांनी केली होती. भाजपने उमेदवार जाहीर करताच शिंदे गटाने ही जागा लढण्याचा निर्धार कायम ठेवला. चिवटे हे मंगळवारी पक्षाच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत. ‘पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेना निवडणूक लढणार आहे. भाजपने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे’, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत तोडगा न निघाल्यास मैत्रीपूर्ण लढत होण्याची चिन्हे आहेत.
भाजपचे धक्कातंत्र
पुणे शिक्षक मतदारसंघातून पक्षातही फारसे कोणाला परिचित नसलेल्या कौस्तुभ गावडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. गावडे हे कोल्हापूरमधील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कोल्हापूरमधील अधिक मतदार लक्षात घेता भाजपने पदवीधरप्रमाणेच शिक्षक मतदारसंघातही कोल्हापूरला उमेदवारी दिली आहे.
भाजपचे तीन उमेदवार :
पुणे पदवीधर : डॉ. स्मिता जाधव
नागपूर पदवीधर : सुधाकर कोहळे
पुणे शिक्षक : कौस्तुभ गावडे
मतांच्या नोंदणीचे गणित
’कोल्हापूर जिल्ह्यात झालेली सर्वाधिक मतदार नोंदणी लक्षात घेऊन भाजपने ‘पुढारी’कार जाधव यांच्या घरात उमेदवारी दिली आहे. स्मिता जाधव या डी. वाय. पाटील यांची नात आहे. ’वडील पी. डी. पाटील हे पुणे व पिंंपरी-चिंचवडमधील शिक्षण संस्थेचा कारभार बघतात. याआधी भाजपकडून जाधव यांचे पुत्र योगेश यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. ’अमरावती शिक्षक मतदारसंघात श्री शिवाजी शिक्षण संस्थेतील शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर मतदार यादीत नोंदणी करण्यात आली आहे. या शिक्षण संस्थेचे पसरलेले जाळे लक्षात घेता काँग्रेसने माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांची कन्या आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपमध्ये नागपूरवरून बंडखोरी?
नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्याने दुसरे इच्छुक माजी आमदार अनिल सोले हे नाराज झाले आहेत. पक्षाची उमेदवारी मिळाली नसली तरी सोमवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह आणि पदवीधरांच्या विश्वासाच्या जोरावर ही निवडणूक लढणार असल्याचे सोले यांनी जाहीर केले. सोले यांनी अर्ज दाखल करू नये म्हणून भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत.
