मुंबई : वैधानिक समित्यांमध्ये विरोधकांवर मात करण्यासाठी भाजप-शिवसेना (शिंदे) महायुतीने संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला सोबत घेण्याचे ठरवले आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाचा सहयोगी पक्ष म्हणून राष्ट्रवादी (अजित पवार) गटाची नोंदणी करण्याचा मार्ग काढण्यात आला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीची गटनोंदणी रखडली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचा सहयोगी पक्ष म्हणून गुरुवारी नोंदणी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास वैधानिक समित्यांवरील सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ वाढणार आहे. त्याचा फटका शिवसेना (ठाकरे) पक्षाला बसणार असून वैधानिक समित्यांमधील त्यांचे संख्याबळ एकने कमी होणार आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक होऊन २० दिवस झाले असून अद्याप राष्ट्रवादी (अजित पवार) गटाची नोंदणी रखडली होती. या पक्षाचे तीन नगरसेवक असून या नगरसेवकांची नोंदणी गुरुवारी झाली. मात्र गट म्हणून या तीन नगरसेवकांची अद्याप नोंदणी झालेली नाही. मुंबई महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. महायुतीत भाजपला ८९ जागा आणि शिवसेना (शिंदे) पक्षाला २९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दोघांचे मिळून ११८ नगरसेवक निवडून आले आहेत.
महायुतीला आपला महापौर निवडून आणणे सहज शक्य असले तरी वैधानिक समित्यांमध्ये विरोधकांचे आणि सत्ताधाऱ्यांचे समसमान संख्याबळ होत आहे. त्यामुळे महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करणे सत्ताधाऱ्यांसाठी अवघड बनले असते. यावर तोडगा म्हणून आधी भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्ष संयुक्त गटनोंदणी करणार होते. मात्र नंतर या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केले. तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या तीन नगरसेवकांना सोबत घेऊन शिवसेना (शिंदे) पक्ष एक गट तयार करणार असल्याचा मार्ग काढण्यात आला. मात्र राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी अद्याप आपल्या पाठिंब्या संदर्भातील गटनोंदणी केलेली नाही. या तीन नगरसेवकांची नगरसेवक म्हणून नोंदणी मंगळवारी झाली असली तरी पाठिंब्यासाठी पक्षाकडून पत्र मिळणे बाकी असल्यामुळे ही नोंदणी रखडल्याचे समजते.
वैधानिक समितीमध्ये संख्याबळ का महत्त्वाचे
स्थायी आणि सुधार या समित्यांमध्ये २६ सदस्य असतात. त्यात राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार त्यांना सदस्य नेमता येतात. या दोन्ही समित्यांमध्ये शिवसेना (शिंदे) आणि भाजप महायुतीचे संख्याबळ हे विरोधी बाकांवरील संख्याबळाइतकेच होत होते. त्यामुळे शिवसेना (शिंदे) पक्ष आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे तीन नगरसेवक यांची एकत्र नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच झाल्यास सत्ताधारी पक्षाचा एक सदस्य वैधानिक समित्यांवर वाढणार आहे. तर विरोधी पक्षाचा एक सदस्य कमी होणार आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी यांची एकत्र नोंदणी होणे सत्ताधारी पक्षासाठी आवश्यक आहे.
ठाकरे यांची सदस्य संख्या एकने कमी होणार
राष्ट्रवादी आणि शिवसेना (शिंदे) यांनी एकत्र गट स्थापन केल्यास या दोन पक्षांची मिळून सदस्य संख्या ३२ होणार आहे. त्यामुळे त्यांना स्थायी समितीमध्ये चार सदस्य पाठवता येणार आहेत. या दोघांची एकत्र नोंदणी झाली नाही तर ठाकरे यांच्या शिवसेनेला आठ सदस्य समितीवर पाठवता आले असते. परंतु, राष्ट्रवादी आणि शिवसेना (शिंदे) हे पक्ष एकत्र आल्यास ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ सात सदस्यच स्थायी आणि सुधार समितीवर पाठवता येणार आहेत. तसेच एमआयएम पक्षाला देखील सभागृहातील एका नामनिर्देशित सदस्याला मुकावे लागणार आहे.

