पश्चिम रेल्वेचे माजी महाव्यवस्थापक असलेले महेशकुमार यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) जाळ्यात अडकविण्याची ‘टीप’ रेल्वे बोर्डातील उत्तर प्रदेश लॉबीतील काही अधिकाऱ्यांनीच दिली होती. ही माहिती देण्यासाठी काही अधिकारी स्वत:हूनच सीबीआयच्या संपर्कात होते, असे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.
रेल्वे बोर्डात इलेक्ट्रिकल विभागाचे सदस्य व्हायची महेशकुमार यांची महत्त्वाकांक्षा होती. प्रत्यक्षात रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष होणे शक्य असल्याचे काही माहितगारांनी सांगितल्यामुळे त्यांनी चंदिगढमधील काही रेल्वेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरले आणि नेमके काय करावे लागेल, याची माहिती घेतली होती. रेल्वे बोर्डाचे सध्याचे अध्यक्ष विनय मित्तल हे जुलै महिन्यात निवृत्त होत असून त्यांच्या जागी सध्या रेल्वे बोर्डात ज्येष्ठ सदस्य असलेले कुलभूषण यांची नियुक्ती अपरिहार्य होती. तथापि, त्यांना डावलून हे पद मिळविण्यासाठी महेशकुमार यांनी पंजाब-चंदिगढमधील आपल्या काही हितचिंतकांना हाताशी धरले होते. त्यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारेच त्यांनी १० कोटींऐवजी दोन कोटी रुपयांची तडजोड घडवली होती.
सध्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष मित्तल हे मुंबईमध्ये मध्य रेल्वेमध्ये महत्त्वाचे पद भूषवून नंतर रेल्वे बोर्डात गेले आहेत. त्यांचे संभाव्य वारसदार म्हणवले जाणारे कुलभूषण हेही काही वर्षांपूर्वी मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यानंतरच महेशकुमार यांची पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी वर्णी लागली होती. मुंबईमध्ये महाव्यवस्थापकपदी असलेल्यांना किती ‘मान’ असतो याची मित्तल आणि कुलभूषण यांना पूर्ण माहिती असून महेशकुमार यांच्या महत्त्वाकांक्षेच्या हालचालींची त्यांना कुणकुण लागली होती. पंजाब-चंदिगढ आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांतील अधिकाऱ्यांच्या परस्परांमधील सत्तास्पर्धेत महेशकुमार सापडले. त्यामुळेच कुलभूषण यांच्या हितचिंतकांनी सीबीआय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली, असे सांगण्यात येते. मित्तल आणि कुलभूषण यांचे असलेले सख्य महेशकुमार यांच्या अटकेमागचे खरे कारण असल्याची जोरदार चर्चा रेल्वे मंडळात सुरू आहे.
महाव्यवस्थापकपदी अगरवाल
पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त पदभार आर. सी. अगरवाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ते उत्तर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापकही आहेत.