मुंबई : महिला शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील योगदानाची अधिकृत ओळख मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीसाठी राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी, ७ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरातून ३७ लाख ९३ हजार ०५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. ८९५ ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन ६८ हजार ४३६ महिलांना शेतकरी महिला प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे.

राज्य सरकारने ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा, २०२६’ विधेयक पारित केले आहे. त्यानुसार महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख, समान अधिकार आणि शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शेतकरी महिला प्रमाणपत्र देण्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे, या आचारसंहितेमुळे ग्रामसभा घेता येत नाहीत. आचारसंहिता संपताच ग्रामसभा घेऊन संबंधित महिलाना प्रमाणपत्र कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.

राज्यभरातून बुधवार, ७ ऑक्टोबरपर्यंत तब्बल ३७ लाख ९३ हजार ०५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी राज्यातील ८९५ ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन ६८ हजार ४३६ महिलांना शेतकरी महिला प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. ग्रामसभा झाल्यानंतर पुढील १५ दिवसांमध्ये शेतकरी महिलांना प्रमाणपत्र वितरित केले जाईल. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात नोंदणी होत आहे.

अर्ज संख्येत यवतमाळ जिल्हा आघाडीवर असून, तेथून २ लाख ५३ हजार ४३९ अर्ज प्राप्त झाले आहेत. सातारा २ लाख १४ हजार ७८७, नाशिक २ लाख १० हजार ३२७, अमरावती २ लाख ०५ हजार ०७४, पुणे १ लाख ७३ हजार ०४९ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. या शिवाय बुलढाणा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नंदुरबार, जळगाव, नांदेड, धाराशिव, धुळे, बीड आणि जालना जिल्ह्यांतून एक लाखांहून अधिक महिला शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तालुकानिहाय नोंदणीत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात सर्वाधिक ३५ हजार ४२२ नोंदणी झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ हा कालावधी ‘सेवा संकल्प अभियान’ म्हणून साजरा होत असून, १७ सप्टेंबर रोजी महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या ऑनलाइन पोर्टलचा प्रारंभ करण्यात आला. या सेवा संकल्प अभियानात आतापर्यंत राज्यातील विविध विभागांच्या तुलनेत कृषी विभागात सर्वाधिक नोंदणी झाली असून, महिला शेतकऱ्यांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे.