तिजोरीत खडखडाट असताना पालिकेचा नव्या प्रकल्पासाठी अट्टहास

मुंबई : पालिकेच्या पूल विभागाने माहीम किल्ला ते वांद्रे किल्ल्यापर्यंत साडेतीन किलोमीटर लांबीची सायकल मार्गिका आणि चालणाऱ्यांसाठी उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी नुकत्याच निविदा मागविण्यात आल्या आहेत. मात्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील या प्रकल्पाला आता विरोध होऊ लागला आहे. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना १६७ कोटी खर्चून हीे मार्गिका तयार करण्याची काय गरज, असा सवाल करीत समाजवादी पार्टीने या प्रकल्पाला विरोध केला आहे. तात्काळ ही निविदा प्रक्रिया थांबवावी आणि अर्थसंकल्पातील कामांना प्राधान्य द्यावे, मागणी समाजवादी पार्टीकडून करण्यात आली आहे.

माहीम किल्ला ते वांद्रे किल्ला यादरम्यान ३.५९ किमीची एक सायकल मार्गिका उभारण्यात येणार आहे. या मार्गिकेची रुंदी सहा मीटर आहे. त्यात येण्या-जाण्यासाठी प्रत्येकी १.७५ मीटर रुंदीच्या दोन सायकल मार्गिका असतील, तर २.५ मीटर रुंदीची मार्गिका पादचाऱ्यांसाठी असेल. या प्रकल्पासाठी पूल विभागाने नुकतीच निविदा मागवली आहे. हा प्रकल्प म्हणजे भविष्यात मुंबईची ओळख बनू शकेल व पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरेल असा प्रशासनाचा दावा आहे. मात्र प्रकल्पाचे काम सुरू होण्याआधीच तो वादात सापडला आहे. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना आणि अर्थसंकल्पातील मूलभूत विकास कामे पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडत असताना असे प्रकल्प आणण्याची गरज काय, असा सवाल समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केला आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी थांबवावी, अशी मागणी शेख यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहून केली आहे.

शेख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, निधी नसल्याचे कारण देत पालिकेच्या अर्थसंकल्पातील रस्ते कामांसाठी १२०० कोटींची कामे रखडली आहेत. तसेच पालिकेच्या शाळांच्या दुरुस्तीची १७० कोटींची कामेही रखडली आहे. असे असताना पालिकेच्या अर्थसंकल्पातील कामांना प्राधान्य न देता नवनवीन प्रकल्प आणून त्यांना प्राधान्य देणे ही खेदजनक बाब आहे. गेल्या काही वर्षांत व टाळेबंदीमुळे पालिकेचे उत्पन्न घटले आहे व खर्च वाढला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पालिकेच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढावी, अशीही मागणी शेख यांनी केली आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पात अतंर्भूत प्रकल्पांचीच कामे पालिकेने प्राधान्याने हाती घ्यावी अशी मागणी करत या नव्या सायकल मार्गिकेला समाजवादी पार्टीने विरोध केला आहे. त्यामुळे या वादाला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय रंग येण्याची चिन्हे आहेत.