मुंबई : माहीम विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार महेश सांवत यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलासा दिला. त्यांच्या आमदाराकीला आव्हान देणारी शिंदे गटाचे सदा सरवणकर यांची निवडणूक याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने सरवणकर यांच्या निवडणूक याचिकेवर मंगळवारी निर्णय देताना फेटाळली. .

प्रकरण काय ?

नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच, सरवणकर यांनी ही निवडणूक याचिका दाखल केली होती. सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यांची माहिती लपवून ठेवली. असे करून सावंत यांनी मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप सरवणकर यांनी याचिकेद्वारे केला होता.

तसेच ही माहिती न देणे हे सावंत यांना अपात्र ठरवण्यासाठी आणि २०२४ च्या माहीम विधानसभा निवडणुकीचे निकाल रद्द करण्यासाठी पुरेसे कारण असल्याचा दावाही सरवणकर यांच्यातर्फे युक्तिवाद करताना करण्यात आला होता.

माहीम निवडणूक प्रतिष्ठेची

विधानसभा निवडणुकीदरम्यान माहीम मतदारसंघातील निवडणूक शिंदे गट, ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी (मनसे) प्रतिष्ठेची ठरली होती. शिंदे गटाचे विद्यमान सरवणकर, ठाकरे गटाचे महेश सावंत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांच्यात या मतदारसंघातून तिहेरी लढत रंगली होती. त्यावेळी महायुतीतील अंतर्गत संघर्षही दिसून आला होता.

भाजपा नेत्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उघडपणे सरवणकर यांना माघार घेण्यास सांगितले होते. नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, सरवणकर हे अमित यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. परंतु, ठाकरे कुटुंबीयांनी त्यांना भेटण्यास नकार दिल्याचे म्हटले गेले होते, त्यानंतर सरवणकर यांनीही माघार घेण्यास नकार दिला.

तथापि, सावंत यांनी माहीम मतदारसंघातून ५०,२१३ मतांनी विजय मिळवला, तर सरवणकर यांना ४८,८९७ मते मिळाली आणि अमित ठाकरे यांना ३३,०६२ मते मिळाली होती.