सात बेटांपैकी एक असलेल्या ट्रॉम्बे बेटावरील एका टोकाला माहुल कोळीवाडा आहे. या कोळीवाड्याची जेट्टी आजही चांगल्या स्थितीत आहे. अनेक बोटी किनाऱ्याला आढळतात. पण मासेमारीसाठी आवश्यक समुद्रच प्रदूषित झाला आहे. त्यामुळे मासळीचा दुष्काळ अनुभवावा लागत आहे. आता फक्त मुंबईतला मोठा कोळी महोत्सव या ओळखीपुरताच माहुल कोळीवाडा शिल्लक राहिला आहे. एकेक करुन सर्व कोळीवाड्यांची अशीच गत होत चालली आहे, हे प्रत्यक्ष दिसून येते.
कुलाब्यापासून मांडवी, शिवडी या नष्ट झालेल्या कोळीवाड्यांच्या तुलनेत ‘माहुल कोळीवाडा’ आजही आपले काहीसे अस्तित्त्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु भारत पेट्रोलिअम आणि हिंदुस्थान पेट्रोलिअम या सरकारी तेल कंपन्या, टाटा विद्युत कंपनी आणि खासगी सी-लॉर्ड कंटेनर्स कंपनी अशा चहुबाजुंनी पसरलेल्या चक्रव्युहात अडकलेला माहुल कोळीवाडा आता शेवटच्या घटका मोजतोय, असे म्हटले तर वावगे ठरु नये.
परप्रांतीयांनी कब्जा केलेल्या झोपड्या, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत प्रकल्पबाधितांच्या वीस्तीर्ण पसरलेल्या इमारतींमुळे याही कोळीवाड्याचे अस्तित्त्व आता पुसत चालले आहे. तरीही आपले पारंपारिक सण साजरे करुन कोळी बांधव आपल्या अस्तित्त्वाची सतत जाणीव करुन देत आहेत. माहुल कोळीवाड्याच्या गल्लीतच मासळी बाजार आढळत असला तरी हे मासे मात्र माहुलजवळ क्वचितच आढळतात, अशी खंत स्थानिक कोळी रहिवाशी व्यक्त करतात.
माहुल गाव हे तसे प्रदुषणामुळे बदनाम झालेले. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाअंतर्गत हौसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लि. म्हणजेच एचडीआयएलने प्रकल्पबाधितांसाठी भरमसाठ घरे बांधली. परंतु या घरांत कुणी गेलेच नाही. तेव्हा झोपु प्राधिकरणाचे लक्ष माहुल कोळीवाड्यासभोवताली असलेल्या गर्द हिरवाईने भरलेल्या भूखंडांकडे गेले.
वर्षानुवर्षे असलेली आमराई झोपु प्राधिकरणाला पाहवली नाही आणि गावकऱ्यांचा, कोळी बांधवांचा विरोध डावलून रातोरात आमराई नष्ट करण्यात आली. माहुल कोळीवाड्याच्या एका बाजुला झोपु प्राधिकरणाच्या इमारतींची भली मोठी रांग लागली. या इमारतींमुळे या परिसराची लोकसंख्या अचानक वाढली आणि एकेकाळी शांत असलेला माहुल कोळीवाडा परप्रांतीयांच्या गजबजाटाने बेजार झाला. एका कोपऱ्यात माहुल जेट्टीपर्यंतचा थोडासा परिसर सोडला तर आता परप्रांतीयांच्या कोलाहलाने कोळीवाड्याची शांतता दिवसेंदिवस भंग पावत चालली आहे.
कुर्ला पूर्व रेल्वे स्थानकापासून तब्बल ४० ते ५० मिनिटांच्या अंतरावर मुंबईच्या एका टोकाला असलेल्या माहुल कोळीवाड्यात पोहोचता येते. डाव्या बाजुला भारत पेट्रोलिअम, हिंदुस्तान पेट्रोलिअम आणि टाटा वीज कंपनी, सीलॅार्ड कंटेनर्स, माहुलचा डोंगर दिसतो आणि उजव्या बाजुला एका छोट्या गल्लीत प्रवेश केल्यानंतर या कोळीवाड्याची हद्द सुरु होते.
थोडे आत शिरल्यानंतर शंभर वर्षांहून अधिक जुने असलेले हनुमान मंदिर आपले स्वागत करते. कोळीवाड्यात प्लेगची साथ आली तेव्हा बजरंगबलीनेच संपूर्ण गावाचे रक्षण केले, अशीच भावना रहिवाशांची आहे. त्यामुळे हनुमान जयंती उत्सव माहुल कोळीवाड्यात दणक्यात साजरा होतो. अगदी थाटात होणारा पालखी सोहळा पाहण्यासाठी मुंबईकरही हजेरी लावतात, असे या कोळीवाड्यातील एक प्रतिष्ठित नागरिक व माहुल ग्राम समितीचे माजी अध्यक्ष रमेश पाटील यांनी सांगितले.
पाटील यांचे संपूर्ण बालपण या कोळीवाड्यातच गेले. पूर्वी हा कोळीवाडा आपली शान टिकवून होता. आम्ही या कोळीवाड्यातून मुंबईत जायचो तेव्हा अभिमानाने म्हणायचो, मुंबईला जाऊन येतो. इतका हा भाग आडवळणाचा होता. बेस्ट बस अलीकडेच आली.परंतु त्याआधी बैलगाडी वा होडी हेच प्रवासाचे साधन होते, असे सांगताना पाटील आठवणीत रमतात. कोळीवाडा असला तरी मासेमारीसोबत शेती हा मुख्य व्यवसाय होता. तांदूळ आणि झेंडुची फुले मोठ्या प्रमाणात व्हायची. ६०० ते ७०० एकर परिसरातील शेतीमुळे कोळीवाड्याला गावपण लाभले होते.
मोठमोठ्या आंब्याच्या बागाही होत्या. ठाणे तसेच मुंबईतील लोकं या ठिकाणी सहलीसाठी येत असत. फ्लेमिंगोंचे अमर्याद दर्शन हे आकर्षण होते. परंतु २६/११ चा दहशतवादी हल्ला आणि अटल सेतूमुळे आता हे इतिहासजमा झाले आहे. १९५० च्या आसपास आमच्या शेतजमिनीकडे सरकारचे लक्ष गेले. तेल कंपन्यांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या. प्रत्येक यार्डापोटी फक्त ७५ पैसे इतका भाव तेव्हा दिला गेला. देशप्रेमाने भारलेल्या आमच्या पूर्वजांनी जे दिले ते गुपचूप पदरी पाडून मोठ्या मनाने सरकारी उपक्रमासाठी जमिनी दिल्या.
या मोबदल्यात आम्हाला सरकारी कंपन्यात नोकऱ्या देऊ करण्यात आल्या. परंतु तेव्हा मासेमारीला चांगले दिवस होते. माहुलकर, कोळी, वैती, पाटील ही कोळी घराणी होती. हडसूळ, काटवले ही शेती करणारी कुणबी कुटुंब होती. महिन्याकाठी मिळणाऱ्या वेतनाची रक्कम एका दिवसात मिळत असल्यामुळे नवनवीन आलेल्या तेल कंपन्यांमध्ये मोठी भरती असुनही या तरुणांनी त्या नोकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. आज मासेमारीचा दुष्काळ आणि पदरी नोकऱ्या नसल्यामुळे सध्या अस्तित्त्वात असलेल्या घरांवर मजले चढवून घरे भाड्याने देण्याचा धंदा आता कोळीबांधवांनी अंगीकारला आहे, याकडे पाटील लक्ष वेधतात.
तेल कंपन्यांच्या प्रदुषणामुळे खरेतर मासेमारीवर मोठा परिणाम झाला. तेल कंपन्यांनी त्या दिशेने काही पावलेही उचलली. परंतु पुढे मुंबई जशी वाढत गेली, तसे मोठ्या प्रमाणात सांडपाणी समुद्रात सोडले जाऊ लागले आणि समुद्रकिनारी मिळणाऱ्या माशांचा दुष्काळ निर्माण झाला तो आजतागायत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविला गेला. परंतु माशांचा दुष्काळ काही मिटला नाही. रावस, बोंबील, कोळंबी, निवटे, मांदेली, करंदी, घोळ मासा, खेकडे अशी माशांची मांदियाळी किनारी मोठ्या प्रमाणात आढळत होती. वाणेवाले, डोलकर, फगवाले आणि ट्रॉलरवाले यांची चलती होती. मात्र आता त्यांची संख्याही रोडावली आहे.
चरेश्वर राजाच्या अखत्यारीखाली माहुल परिसर होता. त्यांचे मंदिरही येथे आढळते. मध्यंतरी शिलालेखही सापडला होता. कोळीवाड्याच्या मध्यभागी जरुआई मरुआई या ग्रामदेवेतेचे मंदिर गावातील एकमेव शाळेमागे आहे. तेथूनच जेट्टीपर्यंत रस्ता जातो. फ्लेमिंगो दर्शनासाठी बोटी समुद्रात घेऊन जाण्याचा मोठा धंदाही २६/११ च्या हल्ल्यानंतर पोलिसांनी बंद केला. माहुलवरुन घारापुरी बेटावर जाता यायचे. न्हावा-शेवा शिवडी लिंक सेतुमुळे आता सगळीच गणितेही बदलली आहेत.
२०२१ मध्ये या कोळीवाड्याचेही सीमांकन झाले आहे. परंतु अहवाल शासनाच्या तिजोरीत आहेत. कोळीवाड्यांबाबत धोरण निश्चित करण्याची कुठलीही चिन्हे दिसत नसल्यामुळे हे कोळी बांधव चिंताग्रस्त आहेत. आमचे कोळीवाडे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत नेस्तनाबूत करु नका, अशी आग्रही मागणी तेही करीत आहेत. आमच्या घरांचे आकारमान पाहून किमान तेव्हढी घरे आम्हाला मिळावीत, अशी माफत अपेक्षा आहे. कारण कोळीवाडे टिकून राहतील याची त्यांनाही आता खात्री राहिलेली नाही.
प्रदूषणाचा त्रास आजही कायम… माहुल परिसरात अनेक रासायनिक कारखाने आणि तेल शुद्धीकरण प्रकल्प आहेत. या सर्व कंपन्या मुख्यत्वे तेल, वायू आणि रसायनांची साठवणूक करतात. परंतु साठवणूक करताना होणाऱ्या प्रक्रियेमुळे बाष्पीभवनाद्वारे हवेत घातक रसायने मिसळतात. त्यामुळे हवेची गुणवत्ता कमालीची खालावून हा परिसर ‘गॅस चेंबर’ बनल्याचे राष्ट्रीय हरित लवादाच्या निकालात म्हटले होते. हवेतील विषारी घटकांमुळे स्थानिक रहिवासी (कोळी बांधव) आणि स्थलांतरित प्रकल्पग्रस्तांना श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि फुफ्फुसाचे विकार यांसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
माहुल कोळीवाड्यातील रहिवाशी चारुदत्त कोळी यांच्या तक्रारीनंतर २०१४ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने या प्रकरणाची दखल घेतली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही हवेची गुणवत्ता ढासळल्यामुळे या कंपन्यांना उत्पादनात व क्षमतेत ५० टक्के कपात करण्याचे आदेश दिले होते. प्रदूषण नियंत्रणासाठी कंपन्यांना बंदिस्त छताच्या टाक्या बसवणे आणि धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले. परंतु अद्यापही कंपन्यांकडून काळजी घेतली जात नसल्याचे कोळी यांनी सांगितले. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतरही या कंपनीकडून प्रदूषण सुरुच असल्याचा आरोप केला जात आहे.
