मुंबई: गेल्या किमान पाच सहा वर्षांपासून रखडलेल्या माहूल उदंचन केंद्राच्या उभारणीतील जागेचा तिढा सुटला असून लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. प्रकल्पाच्या पूर्व तयारीच्या कामांना सुरुवात झाली आहे. अडीच तीन वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार असून त्यामुळे पूर्व उपनगरातील सायन, वडाळा, गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, चेंबूर या परिसराची पावसाचे पाणी तुंबण्यापासून सुटका होणार आहे.
चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या मुंबईत दरवर्षी अतिवृष्टीच्या वेळी पावसाचे पाणी साचते. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी शहरात शिरत असल्यामुळे पातमुखे बंद करावी लागतात. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक पद्धतीने निचरा होऊ शकत नाही. त्यावर उपाय म्हणून ब्रिमस्ट्रोवॅड अहवाल आणि चितळे समितीच्या शिफारशीनुसार मुंबईत आठ ठिकाणी पर्जन्य जल उदंचन केंद्रे उभारण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला होता.
त्यापैकी हाजीअली, ईर्ला, लवग्रोव, क्लिव्हलॅण्ड, ब्रिटानिया आणि गझदरबंध ही सहा उदंचन केंद्रे बांधून कार्यान्वित झाली आहेत. म्हणजेच पावसाचे पाणी उचलून समुद्रात फेकणारे अवाढव्य पंप या ठिकाणी उभारले आहेत. एकूण आठ उदंचन केंद्रापैकी अंधेरी येथील मोगरा नाल्यावरील उदंचन केंद्राचे व माहूल उदंचन केंद्राचे काम मात्र जागेअभावी रखडले होते. मात्र या दोन्ही उदंचन केंद्राच्या जागेचा तिढा सुटला असून काम आता मार्गी लागणार आहे. प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होऊन प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
माहूल उदंचन केंद्रासाठी लागणारी जागा ही मिठागर आयुक्तांच्या मालकीची होती. मात्र ही जमीन हस्तांतरीत करण्यासाठी मुंबई महापालिकेने अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्यावर प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्याला नुकतीच मान्यता मिळाली असून खासगी मालकालाही नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. ती लवकरच दिली जाईल, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जागेचा ताबा मिळाला असून पूर्व तयारीची कामे सुरू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. माती परिक्षणाचे काम सुरू झाले असून त्यानंतर पायलिंगची कामे सुरू होतील असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
खर्च वाढण्याची शक्यता .. या प्रकल्पासाठी पालिकेने २०२१ मध्ये निविदा मागवल्या होत्या. तेव्हा या प्रकल्पाची किंमत ४०३ कोटी होती. मात्र जागेच्या तिढ्यामुळे ही निविदा रद्द केली होती. २०२३ मध्ये पुन्हा निविदा मागवली तेव्हा प्रकल्पाचा खर्च ६०५ कोटींवर गेला होता. या कामाचे कार्यादेश २०२६ मध्ये देण्यात आले असून मधल्या काळात महागाई वाढल्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यताही व्यक्त होते आहे.
केंद्र सरकारचा प्रकल्प ….. मुंबईतील पावसाळ्यातील पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेने सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. याकरीता केंद्र सरकार काही निधी देणार आहे.
शहरातील जलनिस्सारण, पंपिंग व्यवस्था, नाल्यांची क्षमता वाढविणे, मिठी नदी सुधारणा तसेच निसर्गाधारित उपाययोजनांचा या आराखड्यात समावेश आहे. या महाप्रकल्पात मोगरा आणि माहूल या उदंचन केंद्रांचाही समावेश करण्यात आला आहे.
