पाच मुख्य रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्यांना समज

दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे मार्ग, दादरमधील गोखले मार्ग, पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्ग व न्यू लिंक रोड या रस्त्यांच्या पाच प्रमुख रस्त्यांवर ‘नो पार्किंग’ची कारवाई पालिकेने शुक्रवारी सुरू केली. मात्र, गतवेळचा अनुभव लक्षात घेऊन पहिल्या दिवशी वाहनचालकांना केवळ समज देऊन सोडण्यात आले.

आधीच्या ‘वाहनतळ बंदी’ कारवाईचा जोर मुंबईत फारसा जाणवला नाही. पाचही रस्त्यावर वॉर्ड अधिकारी आपापल्या पद्धतीने कारवाई करत होते. सी विभागात सर्वात जास्त जोमाने कारवाई करण्यात आली. अन्य विभागांनी मात्र प्रबोधन करणे आणि फलक लावणे अशी कामे केली.

सार्वजनिक वाहनतळाच्या परिसरात उभ्या केलेल्या गाडय़ांवर ७ जुलैपासून पालिकेने दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली होती. त्या कारवाईवरून पालिकेवर टीका झाल्यानंतर पालिकेची कारवाई काहीशी थंडावली. नंतर दुचाकींना कारवाईतून वगळण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात पालिकेने ही कारवाई अधिक व्यापक करत मुंबईत आरपार जाणारे पाच मुख्य रस्ते वाहनतळ मुक्त करण्याचे ठरविले आहे. सकाळी व संध्याकाळी या रस्त्यांवर दुतर्फा गाडय़ा उभ्या केल्यामुळे वाहतूक खोळंबा होत असतो. त्यामुळे वाहतूक अधिकाधिक सुरळीत, गतिमान व शिस्तबद्ध व्हावी, तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सक्षम व्हावी, बसगाडय़ांना जागा मिळावी या उद्देशाने शुक्रवारपासून प्रायोगिक तत्त्वावर ही कारवाई करण्यास सुरुवात झाली.  दोन ते सहा किमी लांबीचे हे रस्ते असून ते वेगवेगळ्या वॉर्डात विभागले गेले आहेत. त्यामुळे एकाच रस्त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई सुरू असल्याचे चित्र दिसत होते.

महषी कर्वे रोड : दुतर्फा की एकतर्फी?

ही कारवाई दुतर्फा केली जाणार असे म्हटले जात असले तरी दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे रोडवर मात्र केवळ रेल्वे ट्रॅकला लागून असलेल्या मार्गावरच कारवाई होत होती. तर दुसरी बाजू पार्किंगसाठी तशीच होती. त्यामुळे या संपूर्ण कारवाईविषयी अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम असल्याचे जाणवत होते. या मार्गावर सात गाडय़ा उचलण्यात आल्या, तर ११ गाडय़ांना ‘जॅमर’ लावण्यात आले. तसेच ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तर एस व्ही रोड  आणि लिंक रोडवर केवळ दोन गाडय़ा उचलण्यात आल्या.

एलबीएस मार्ग : फलक लावण्यावर भर

महापालिकेच्या एस आणि टी विभाग कार्यालयांनी लालबहादूर शास्त्री मार्गाच्या (एलबीएस)  दुतर्फा कारवाईचा इशारा देणारे फलक लावले होते. वाहने उभी करणाऱ्या चालकांना दंडाची जाणीव करून दिली जात होती. पहिल्या दिवशी दोन वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मेट्रो कामामुळे हा मार्ग अरुंद झाल्याने आणि जवळच वाहतूक पोलिसांची चौकी असल्याने येथे वाहने उभी राहात नाहीत.

एस. व्ही. रोड : जनजागृतीवर भर

एस व्ही रोडवर पहिल्या दिवशी पालिकेकडून अवैध्यरित्या उभ्या केलेल्या तीन गाडय़ांवर कारवाई करण्यात आली. मात्र तरीही अंधेरी परिसरातील स्वामी विवेकानंद रस्त्याच्या कडेला अवैध्यरित्या बस, रिक्षा, चारचाकी कार लावल्याचे दिसत होते. पहिलाच दिवस असल्याने पालिकेचा भर प्रबोधनावर होता. चालकांनी रस्त्याकडेला गाडी लावू नये, असे आवाहन सुरुवातीला करण्यात येत होते. पालिकेच्या के पश्चिम वॉर्डाने कारवाईसाठी सध्या एक टोईंग व्हॅन आणि चार निवृत्त जवानांची नियुक्ती केली आहे.