मुंबई: वेतन वेळेवर मिळत नसल्याच्या मुद्दय़ावरून नुकताच बेस्टमधील कंत्राटी चालकांनी संप पुकारला होता. त्यामुळे पाच आगारातील बस वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांचे हाल झाले. या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर द्यावे, तसेच सर्व कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रमाच्या सेवेत कायम करण्यात यावे, अशी मागणी बेस्ट संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने उपक्रमाकडे केली आहे. यासह विविध मागण्यांसाठी ६ मे रोजी दुपारी ३ वाजता वडाळा आगारात निदर्शने करण्याचा इशारा युनियनने दिला आहे.
बेस्ट उपक्रमाला कंत्राटदाराने भाडेतत्त्वावर बस उपलब्ध केल्या असून या कंत्राटदाराचे दोन हजार कर्मचारी बेस्टसाठी काम करीत आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रमात कायमस्वरूपी नोकरी द्यावी, अशी मागणी बेस्ट संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे नेते शशांक राव यांनी केली आहे.
या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात येत नाही तोपर्यंत त्यांना ‘समान काम, समान दाम’ या तत्त्वावर वेतन द्यावे, सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांना तातडीने नियुक्तीपत्र द्यावे, भविष्य निर्वाह निधीत जमा होणारे अंशदान, वर्गणी याबाबत संबंधित कर्मचाऱ्याला दरमहा वेतनपत्रिकेसोबत माहिती द्यावी, दंडाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बेकायदेशीर कपात तातडीने थांबवावी आदी मागण्याही करण्यात आल्याची माहिती राव यांनी दिली.
