शारीरिक क्षमता क्षीण होत जाणाऱ्या उतारवयात सोबत, शुश्रूषा आणि आधाराची सर्वाधिक गरज असताना कोणत्याही कारणांनी तसा आधार न मिळू शकलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आठ वर्षांपूर्वी निवासी सेवा केंद्र कार्यान्वित करून आसरा देणाऱ्या डोंबिवलीतील मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला आता हक्काची जागा हवी आहे. सध्या भाडेतत्त्वावरील अपुऱ्या जागेत संस्थेचे कामकाज सुरू आहे. संस्थाचालक डॉ. मालिनी केरकर आणि त्यांचे सहकारी गेली काही वर्षे सातत्याने विविध शासकीय आणि निमशासकीय संस्थांकडे जागा मिळण्यासंदर्भात पाठपुरावा करीत आहेत. मात्र असे काम करणाऱ्या संस्थेसाठी जागा देण्याची तरतूद कोणत्याही शासकीय योजनेत नाही. त्यामुळे आता समाजातील संवेदनशील नागरिकांनीच यथाशक्ती मदत देऊन मैत्रीचे हात बळकट करावेत, असे आवाहन संस्था चालकांनी केले आहे.
डॉ. मालिनी केरकर यांनी २००५ मध्ये स्थापन केलेल्या मैत्री फाऊंडेशनतर्फे वृद्ध सेवा केंद्रात निवासी स्वरूपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबरच घरी राहणाऱ्या वृद्धांनाही शुश्रूषेसाठी परिचारिका, आया उपलब्ध करून देण्याचे काम संस्था करते. अस्थिव्यंग झालेल्या नागरिकांना कमोड चेअर, व्हील चेअर, वॉकर, एअर बेड, वॉटर बेड, अ‍ॅडजेस्टेबल बेड आदी साहित्य संस्था पुरविते. स्मृतिभ्रंश होऊन भटकणाऱ्या अनेक वृद्धांना त्यांचे नातेवाईक सापडेपर्यंत संस्थेने आसरा दिला आहे. बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी संस्था पोलिसांना मदत करते. स्वत:च्या जागेत किमान ५० जणांची सोय असणारे अद्ययावत वृद्ध सेवा केंद्र उभारण्यासाठी संस्थेला आता लोकवर्गणीची गरज आहे.