मुंबईच्या कफ परेड परिसरातील मेकर टॉवर या इमारतीला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत होरपळून दोघाजणांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. हे मृतदेह शवविच्छेदन चाचणीसाठी गुरू तेगबहादूर रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मेकर टॉवरच्या २०व्या मजल्यावर फ्लॅटमध्ये लागलेली ही आग २१व्या मजल्यापर्यंत पसरत गेली. त्यामुळे या मजल्यांवरच्या सदनिकांमधील रहिवाशी आगीच्या विळख्यात सापडले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी यापैकी ११ जणांना सुखरूप बाहेर काढले. यामध्ये बजाज इलेक्ट्रीकल्सचे अध्यक्ष शेखर बजाज आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे. मात्र, सर्व्हंट क्वाटर्समध्ये असलेल्या दोन नोकरांना वेळीच बाहेर काढण्यात अपयश आले. आगीत होरपळल्यामुळे हे दोघेहीजण गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मेकर टॉवरच्या २०व्या मजल्यावरील ८ बीएचकेच्या ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये बजाज कुटुंब राहते. तर २१ व्या मजल्यावर सर्व्हंट क्वार्टर्स आहेत. दरम्यान, सध्या अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

मेकर टॉवरच्या २०व्या मजल्यावर लागलेल्या या आगीचे स्वरूप भीषण होते. सुरूवातीला ही आग दुसऱ्या दर्जाची असल्याची सांगण्यात येत होते. मात्र, काहीवेळात आगीने भीषण स्वरूप धारण केल्याने अग्निशमन दलाने ही आग तिसऱ्या दर्जाची असल्याचे जाहीर केले. आज सकाळी ६.३० वाजता इमारतीमधून धुराचे लोट उठू लागल्यानंतर आग लागल्याचे लक्षात आले. या घटनेची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या, पाण्याचे चार बंब आणि तीन रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. २०व्या मजल्यावर आग लागल्यामुळे सुरूवातीच्या काळात आग विझविण्यात अडचणी येत होत्या. मात्र, त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना विशेष शिडीच्या मदतीने २०व्या मजल्यापर्यंत पोहचण्यात यश आले. मात्र, दरम्यानच्या काळात या मजल्यावर अडकून पडलेल्या दोन नोकरांचा होरपळून मृत्यू झाला. सकाळची वेळ असल्याने त्यांना आग लागल्याचे वेळीच लक्षात आले नाही. दरम्यान, या आगीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही.