मुंबई: दक्षिण मुंबईतील रस्त्यावरच्या सशुल्क वाहनतळांच्या (पे अँड पार्क) शुल्क आकारणीत घोटाळा झाला असल्याचा आरोप माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. कंत्राट संपले तरी येथील कंत्राटदारांना अवैधपणे मुदतवाढ दिल्याचा आरोप नार्वेकर यांनी केला आहे. ज्या वाहनतळावर कंत्राटदाराची मुदत संपली आहे अशा वाहनतळासाठी नव्याने निविदा काढून कंत्राटदार निश्चित होईपर्यंत नागरिकांसाठी वाहनतळ मोफत करावे अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे.

दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरच्या वाहनतळांवर जादा शुल्क आकारणी, अनधिकृतपणे शुल्क आकारणी केल्याच्या घटना अनेकदा उघडकीस आल्या आहेत. गेल्याच आठवड्यात काळा घोडा परिसरातील जहांगीर आर्ट गॅलरी आणि व्ही. बी. गांधी मार्ग येथे जादा शुल्क आकारणी केली जात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर प्रशासनाने कंत्राटदार संस्थेवर दंडात्मक कारवाई देखील केली. त्यातच आता दक्षिण मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी दक्षिण मुंबईत आणखी एक आरोप केला आहे. वाहनतळाच्या कंत्राटदाराचे कंत्राट संपलेले असताना त्याला बेकायदेशीरपणे मुदतवाढ दिल्याचा आरोप नार्वेकर यांनी केला आहे. या प्रकरणी मुंबई महापालिका प्रशासनाने एका अभियंत्याला निलंबित केले होते. जर या प्रकरणात अभियंत्याला निलंबित केले होते तरीही या ठिकाणी सशुल्क वाहनतळ सुरू का आहे असा सवाल नार्वेकर यांनी केला आहे. या प्रकरणी नार्वेकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिले आहे. तसेच नव्याने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदार निश्चित होत नाही तोपर्यंत सशुल्क वाहनतळ मोफत करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नार्वेकर यांनी म्हटले आहे की, वाहनतळ कंत्राटदारांना चुकीच्या पद्धतीने मुदतवाढ दिल्याच्या कारणावरून ए वॉर्डमधील सहाय्यक अभियंता (एई) यांना निलंबित करण्यात आले आहे. तथापि, निलंबनानंतरही सशुल्क (पे अँड पार्क) सुविधा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू आहे. जर मुदतवाढ चुकीची होती आणि त्यासाठी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते, तर पे अँड पार्क सुविधा का बंद केली गेली नाही? बेकायदेशीरपणे या सुविधा सुरू ठेवण्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी मागणी मकरंद नार्वेकर यांनी केली.

मकरंद नार्वेकर यांनी दक्षिण मुंबईतील अनियमित मुदतवाढ देवून सुरू असलेल्या सर्व पे अँड पार्कच्या सुविधांना तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली आहे. नवीन पार्किंग धोरण होईपर्यंत आणि या पे अँड पार्कसाठी नवीन निविदा जारी होईपर्यंत सर्व मुंबईकरांसाठी पार्किंग मोफत करावे. नागरिकांना बेकायदेशीर सुरू असलेल्या वाहनतळ कंत्राटामुळे पैसे देण्यास भाग पाडले जाऊ नये, असेही मकरंद नार्वेकर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदारांचे या प्रकरणी साटेलोटे असल्याचा आरोप नार्वेकर यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमत आणि कथित भ्रष्टाचारासाठी जनतेला दंड आकारला जाऊ नये. वाहनतळ कंत्राटाची मुदतवाढ चुकीची आणि अवैध असेल तर ही पार्किंग सेवा सुरू ठेवण्यामागे पालिकेच्या काही उच्चपदस्थ अधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये संगनमत असल्याचे दिसते असाही आरोप नार्वेकर यांनी केला आहे.