मुंबई : भारतातील वैद्यकीय उपकरण क्षेत्र गेल्या दशकात ऐतिहासिक परिवर्तनातून जात असून या उद्योगातील वेगवान वाढ देशाला जागतिक मेडटेक शक्ती बनवण्याच्या मार्गावर आणून ठेवत आहे. २०१५ मध्ये केवळ ५ अब्ज अमेरिकन डॉलरची बाजारपेठ २०२४ मध्ये तब्बल १६ अब्ज युएसडी म्हणजेच १.२ लाख कोटींवर पोहोचल्याची सरकारी आकडेवारी सांगते.
वार्षिक १५ टक्क्यांहून अधिक वाढीच्या दरामुळे भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या मेडटेक बाजारांपैकी एक ठरला आहे. बाजाराचा विस्तार आणि स्थानिक उत्पादनाचे प्रमाण यात झालेली उडी अभूतपूर्व असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
देशातील स्वदेशी उत्पादनाचा वेग हा या वाढीचा सर्वात उल्लेखनीय पैलू मानला जातो. २०१५ मध्ये २.७ अब्ज असलेले वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन २०२४ मध्ये १२ अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचले. मेक इन् इंडिया व प्रॉडक्शन लिंक इंसेंन्टीव्ह योजनेमुळे २६ प्रमुख कंपन्यांनी यात गुंतवणूक केली असून गेल्या चार वर्षात साडेतीन हजार कोटींची भांडवली गुंतवणूक देशात आली. या गुंतवणुकीमुळे आयातीत घट आणि देशातील उत्पादन क्षमतांमध्ये गुणात्मक विस्तार दिसून येतो.
२०१४ मध्ये भारताची आयाताधीनता ८६ टक्के इतकी होती. २०२४ मध्ये हा आकडा ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. ईसीजी मशीन, ऑक्सीमीटर, ब्लड-प्रेशर मॉनिटर्स, स्टेंट्स, ऑर्थोपेडिक इम्प्लांट्स आणि आयसीयू उपकरणे यांसारखी महत्त्वाची उपकरणे आता मोठ्या प्रमाणात देशातच तयार होऊ लागली आहेत.
निर्यातीच्या बाबतीत भारताने मागील पाच वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. डीजीसीआय ॲण्ड एसच्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये भारताची वैद्यकीय उपकरण निर्यात ३.२ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचली असून २०१८ च्या तुलनेत ही वाढ जवळपास ६५ टक्के आहे. अमेरिकन बाजारपेठ ही भारताची सर्वात मोठी ग्राहक असून, त्याखालोखाल यूएई, सिंगापूर, आफ्रिका आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये भारतीय मेडटेक उपकरणांना भरीव मागणी आहे. विशेषतः किफायतशीर आयसीयू उपकरणे, पोर्टेबल हेल्थ मॉनिटरींग डिव्हाइसेस, डायग्नोस्टिक किट्स आणि ऑर्थोपेडिक इम्प्लांट्स यांचा भारतीय उत्पादनांना जागतिक स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
वैद्यकीय उपकरण क्षेत्राचे स्वरूप बदलवण्यात सरकारी धोरणांनी मोठी भूमिका बजावली आहे. भारत सरकारने देशात चार प्रगत मेडिकल डिव्हाइस पार्क्स विकसित करण्याचा उपक्रम राबवला आहे. तेलंगणातील मेढक, तमिळनाडूतील तिरुवल्लूर, राजस्थानातील संभरलेक आणि हिमाचल प्रदेशातील नालागढ येथे उभारलेल्या या पार्क्ससाठी केंद्र सरकारने साडेतीन हजार कोटींचे अनुदान जाहीर केले आहे. सामायिक उत्पादन सुविधा, टेस्टिंग लॅब्स, संशोधन व विकास केंद्रे, उच्च-तंत्रज्ञानयुक्त यंत्रसामग्री आणि कमी खर्चात उत्पादन सुरू करण्याच्या संधी यामुळे एमएसएमई क्षेत्रासाठी ही पार्क प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
भारतातील नवोपक्रमाचा प्रवाह हा मेडटेक उद्योगाच्या वाढीमागील आणखी एक महत्त्वाचा स्तंभ आहे. स्टर्टअप इंडियाच्या २०२४ च्या अहवालानुसार देशात ४०० हून अधिक स्टार्टअप्स वैद्यकीय उपकरणांमध्ये संशोधन आणि उत्पादन करत आहेत. एआय आधारित निदान, वेअरेबल हेल्थ डिव्हाइसेस, थ्रीडी प्रिंटेड इम्प्लांट्स, रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली, टेलिमेडिसिन तंत्रज्ञान आणि कमी किमतीतील आयसीयू उपकरणे हे भारतीय संशोधकांनी विकसित केलेले नवोपक्रम जागतिक स्तरावर मान्यता मिळवत आहेत. आयआयटी दिल्ली,आयआयटी मुंबई, आयआयएससी बेंगळुरू, आयसीएमआर आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांचे अनेक संशोधन प्रकल्प पेटंटच्या उंबरठ्यावर आहेत. काही प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय निधीही मिळत आहे.
कोविड महामारीच्या काळात भारतीय उपकरण निर्मितीची क्षमता देशाने प्रभावीपणे सिद्ध केली. या काळात भारतात ११ कोटी रॅपिड टेस्ट किट्स, ६० लाख ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, लाखो पीपीई किट्स आणि मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर्स स्वदेशी पातळीवर तयार करण्यात आले.दीर्घकालीन दृष्टीकोनातून भारत सरकारने मेड टेक व्हिजन २०४७ हे धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार २०४७ पर्यंत भारतीय मेडिकल डिव्हाइस उद्योगाला १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
आयाताधीनता कमी करून स्वदेशी उत्पादनाचा वाटा शंभर टक्क्यांपर्यंत नेणे, संशोधनातील गुंतवणूक दुप्पट करणे, जागतिक टॉप-५ मेडटेक उत्पादक देशांमध्ये भारताला स्थान मिळवून देणे ही या धोरणातील प्रमुख उद्दिष्टे आहेत. डिजिटल हेल्थ मिशन, आयुष्मान भारत–डिजिटल मेडिकल रेकॉर्ड्स आणि टेलि-आयसीयू प्रणाली या कार्यक्रमांमुळे वैद्यकीय उपकरणांची प्रचंड मागणी येत्या काही वर्षांत निर्मिती होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भारताचा वाढता मेडिकल टुरिझम उद्योगही मेडटेक बाजारासाठी मोठा आधार देत आहे. एफसीसीआयच्या अहवालानुसार, दरवर्षी २० लाखांहून अधिक विदेशी रुग्ण उपचारासाठी भारतात येतात. किफायतशीर आरोग्यसेवा, तज्ज्ञ डॉक्टर आणि विकसित होणारी अधोसंरचना यामुळे भारतीय आरोग्यसेवा प्रणाली जागतिक पातळीवर अधिक आकर्षित बनली आहे. या मागणीमुळे आधुनिक उपकरणांची गरज वाढत असून ती भारतीय उत्पादन क्षेत्राची क्षमता वाढवणारी ठरते. एकूण चित्र पाहता भारतीय वैद्यकीय उपकरण उद्योग हा आज स्वयंपूर्णतेच्या दिशेने मोठी झेप घेताना दिसतो.
२०१५ च्या तुलनेत बाजार आकार तीनपट झाला, उत्पादन चारपट झाले, आयाताधीनता कमी झाली, निर्यातीत लक्षणीय वाढ झाली तर नवोपक्रम आणि स्टार्टअप्सनी या उद्योगात नवा उत्साह निर्माण केला. सरकारी धोरणे, वाढलेली गुंतवणूक, संशोधनाचा वेग, उपकरणांच्या किंमतीतील घट आणि जागतिक बाजारपेठेतील वाढत्या मागणीमुळे भारतातील मेडटेक क्रांती देशाच्या आरोग्य व्यवस्थेतील सकारात्मक बदलांचे आधारस्तंभ बनत आहे.
