मुंबई : प्रार्थनास्थळांवरील  भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी बिहार, दिल्ली, गुजरातपासून सुरू करावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. भोंग्यांच्या वादामुळे हिंदूत्व बदनाम होत असून या वादामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

भोंग्यांबाबत शिवसेनेला कोणी अक्कल शिकवू नये. मुस्लीम धर्मीयांसंदर्भातील प्रश्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चर्चेद्वारेच सोडविल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.  मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात राऊत म्हणाले, भोंग्यांवरून राजकारण सुरू असून हे ढोंग फार काळ चालणार नाही. भाजपशासित गुजरात, उत्तर प्रदेशमधील प्रार्थनास्थळांवरील भोंगे अद्याप काढण्यात आलेले नाहीत. भाजपला भोंग्याबाबत काही भूमिका घ्यायची असेल, तर पंतप्रधानांनी गोवंश हत्याबंदीप्रमाणे राष्ट्रीय धोरण ठरवावे. पण त्यातही काही राज्यांना सूट देण्यात आली होती आणि गोवा राज्याने हे धोरण स्वीकारण्यास नकार दिला होता.

भाजप नेत्यांनी आणि त्यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे भोंग्याबाबत वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हिंमत असेल तर केंद्र सरकारने भोंग्यांबाबतही राष्ट्रीय धोरण तयार करून ते अन्य राज्यांमध्ये आधी राबवून दाखवावे. महाराष्ट्र हे कायद्याचे पालन करणारे राज्य आहे, असे राऊत यांनी नमूद केले.

रश्मी शुक्लांना संरक्षण देणे दुर्दैवी

गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी अमली पदार्थाचे तस्कर, समाजविघातक घटक यांचे दूरध्वनी टॅप करायचे आहेत, असे सांगून गृहविभागाची परवानगी घेतली आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे आणि माझा दूरध्वनीही टॅप करण्यात आला होता. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या चर्चा होत असताना आमच्यावर नजर ठेवली जात होती. ज्येष्ठ पोलीस अधिकारी एका राजकीय पक्ष व नेत्याशी असलेली निष्ठा सिद्ध करण्यासाठी हे करीत होती आणि केंद्र सरकार आता रश्मी शुक्ला यांना संरक्षण देत आहे, हे दुर्दैवी आहे, असे राऊत यांनी सांगितले.