ठाण्याच्या धर्तीवर वृत्तपत्र विक्रेत्याना मुंबईमध्ये पदपथावर स्टॉल्स उभारता यावेत यासाठी महापालिकेने र्सवकष धोरण आखावे, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अजय मेहता यांची मंगळवारी पालिका मुख्यालयात भेट घेऊन केली.मुंबई-ठाणे वृत्तपत्र एकीकरण समितीच्या माध्यमातून मुंबईमध्ये वृत्तपत्र वितरित करण्याचे काम केले जाते. मुंबईत अनेक ठिकाणी वृत्तपत्र विक्रेते पदपथावर बसून वर्तमानपत्र विकतात. मात्र महापालिकेतर्फे त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. या संदर्भात ठाणे महापालिकेने ठराव पारित करून काही अटी व शर्तीच्या आधारे वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण दिले आहे. तसेच मुंबई महापालिकेनेही सर्वकष धोरण आखून वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली वृत्तपत्र विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने अजय मेहता यांची भेट घेऊन केली. उपमहापौर अलका केरकर यावेळी उपस्थित होत्या. शिष्टमंडळात अजित पाटील, अजित सहस्रबुद्धे, शिरिष परब, जयवंत डफळे, सुशांत वेंगुर्लेकर आदींचा समावेश होता.