मुंबई :मलबार हिल परिसरातईळ डुंगरशी रोड येथे गुजराती भाषेत लावलेले नामफलक मनसेच्या इशाऱ्यानंतर हटवण्यात आले आहेत. या प्रकरणी मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र अखेर हे फलक हटवण्यात आले. मराठी पाट्यांसाठी महापालिकेने मोहीम राबवलेली असताना प्रत्यक्षात रस्त्यावरील चौकातील अमराठी फलकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे.
मलबार हिल येथील स्वातंत्र्यसैनिक एम. एम. जोशी क्रीडांगण आणि आचार्य विजय ओमकार सुरीश्वर जी महाराज चौक येथील एलिझाबेथ रुग्णालयाजवळ गुजराती भाषेतील नामफलक लावण्यात आले होते. या सर्व प्रकारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला. तसेच मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवून मलबार हिल परिसरात आंदोलन करण्यास मनाई केली आहे.
मलबार हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्षा बंगला व लोकभवन असून या ठिकाणी या शासकीय निवासस्थानांसमोर तसेच अन्य ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या विरूद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, मनसेने इशारा दिल्यानंतर पालिकेच्या डी विभागाने हे फलक हटवले.
आता मुंबईभर मोहीम
मनसेच्या भूमिकेनंतर पालिकेने संबंधित फलक काढून टाकल्यामुळे हा मराठीच्या प्रश्नावरील विजय असल्याचे मत नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता प्रत्येक शाखाप्रमुखाला आपल्या परिसरातील मराठीव्यतिरिक्त अन्य भाषांतील फलकांची माहिती गोळा करण्याच्या सूचना दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधित पालिका विभाग कार्यालयांकडे तक्रारी करून त्याची माहिती पक्ष कार्यालयात संकलित केली जाणार आहे. त्यानंतर महापालिकेला एकत्रित निवेदन देऊन असे फलक हटविण्याची मागणी केली जाईल. फलक हटवले नाहीत तर त्याला आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
