मुंबई : काँक्रीटच्या शहरातून नागरिकांना हिरवाईचा अनुभव देणाऱ्या मलबार हिल येथील निसर्ग उन्नत मार्गाला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अवघ्या वर्षभरात तब्बल ६ लाख ९५ हजार पर्यटकांनी या ठिकाणाला भेट दिली. मार्च २०२५ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पामुळे महापालिकेच्या तिजोरीत तब्बल १ कोटी ७७ लाख रुपयांचा महसूल जमा झाला. मात्र, सुरुवातीला निसर्ग सौंदर्याने भुरळ घातलेल्या या मार्गाचे आकर्षण हळूहळू कमी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

सिंगापूर येथील ”ट्री टॉप वॉक” या संकल्पनेशी साधर्म्य असलेला ४८५ मीटर लांब आणि २.४ मीटर रुंद निसर्ग उन्नत मार्ग ३० मार्च २०२५ रोजी नागरिकांसाठी खुला करण्यात आला. विशेष म्हणजे वृक्षवल्लीमधून ही मार्गिका विकसित करण्यात आली आहे. निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहचवता हा प्रकल्प विकसित करण्यात आला. या मार्गामुळे शहरातही गर्द हिरवी झाडी, पक्षांचा किलबिलाट आणि निसर्गाचे सौंदर्य न्याहाळण्याची संधी मुंबईकरांना मिळू लागली आहे. विविध प्रजातींच्या शेकडो वनस्पती, झाडे, निरनिराळे पक्षी, सरपटणारे प्राणी पाहण्यासाठी हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर दोन दिवसातच ८०९६ पर्यटकांनी भेट दिली. त्यांनतर एप्रिलमध्ये तब्बल ९९ हजार ३२६ पर्यटकांनी उन्नत मार्गाची सफर केली. त्यातून पालिकेला २५ लाख १४ हजार २०० रुपये महसूल मिळाला. नुकतेच या उन्नत मार्गाला मार्चमध्ये एक वर्ष पूर्ण झाले, त्या महिन्यात ३९ हजार ६५८ पर्यटकांनी उन्नत मार्गाला भेट दिली. आतापर्यंत तब्बल ६ लाख ९५ हजार ०६५ पर्यटकांनी निसर्ग उन्नत मार्गाला भेट दिली असून त्यातून तब्बल १ कोटी ७७ लाख ५५ हजार ५५० रुपये महसूल महानगरालिकेच्या तिजोरीत जमा झाला.

दरम्यान, उन्नत मार्गाचे सुरुवातीचे आकर्षण आता काही प्रमाणात कमी झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पर्यटकांच्या संख्येत सातत्याने घट होऊ लागली आहे. वाढलेला तापमानाचा पारा, विद्यार्थ्यांचा परीक्षा काळ आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबईकरांनी गावाकडे घेतलेली धाव आदी विविध कारणांमुळे गेल्या काही आठवड्यांमध्ये निसर्ग उन्नत मार्गावरील पर्यटकांची वर्दळ कमी झाल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दाट वृक्षसंपदा, शांत, प्रसन्न वातावरणामुळे सकाळी व्यायामासाठी, तसेच सायंकाळच्या फेरफटका मारण्यासाठी स्थानिकांची या मार्गाला विशेष पसंती मिळते. त्यांच्यासाठी मासिक पासची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. भारतीय नागरिकांसाठी २५ रुपये, तसेच परदेशी नागरिकांसाठी १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येते. तसेच, गर्दी टाळण्यासाठी एकावेळी केवळ २०० व्यक्तींनाच प्रवेश दिला जातो. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी निसर्ग उन्नत मार्गावर जागोजागी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

चित्रपट व जाहिरातींचे चित्रीकरण

निसर्ग उन्नत मार्गावरील सौंदर्याची भुरळ सिनेमा क्षेत्रालाही पडली असून काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी दिग्दर्शक व निर्माता करण जोहर यांच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण झाले. महापालिकेच्या ठरलेल्या शुल्कानुसार जाहिराती व सिनेमाच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यास सुरुवात झाल्याने महसुलात काही प्रमाणात भर पडण्याची शक्यता आहे.

जैवविविधतेचे दर्शन

निसर्ग उन्नत मार्गावर मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी न्याहाळण्याची संधी मिळते. वनस्पतींमध्ये गुलमोहर, बदाम, जांभूळ, कांचन, ताड, फणस, रतन गुंज, सीता अशोक, अर्जुन, मुचकुंद, सप्तपर्णी, करमळ, विलायती शिरीष आदी प्रजातींचा समावेश असून कोकीळ, ताडपाकोळी, घार, भारतीय राखी धनेश, खंड्या, तांबट, टोपीवाला पारवा, पोपट, हळद्या, नाचण, नाचरा, नर्तक, कावळा, शिंपी चिमणी, बुलबुल, लालबुड्या बुलबुल, साळुंकी, दयाळ, चिमुकला फुलटोचा, जांभळ्या पाठीचा सूर्यपक्षी, शुभ्रकंठी, ठिपकेवाली मनोली यांचेही दर्शन या ठिकाणी घडते.

गेल्या पाच महिन्यांतील पर्यटकांची संख्या

डिसेंबर २०२५ – ५३८२४

जानेवारी २०२६ – ५७७१०

फेब्रुवारी २०२६ – ३८३७२

मार्च २०२६ – ३९६५८

एप्रिल – २०२६ – ३९००५