मुंबई : लहान पाळीव व भटके प्राणी जसे की मांजर, श्वान आदींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी अंत्यविधीची सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. वार्षिक देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव येत्या २ ते ११ जुलै या कालावधीत मालाड येथील प्राण्यांच्या अंत्यसंस्काराची, दहन सुविधा तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. प्राणीप्रेमींची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने पर्यायी सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे.

महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय आरोग्य खाते आणि ”पी उत्तर” विभाग कार्यालय यांच्यामार्फत मालाड येथील एव्हरशाईन नगर येथे मृत प्राण्यांसाठी दहनवाहिनीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठीची ही दहन सुविधा वार्षिक नियोजित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी २ ते ११ जुलै हे दहा दिवस तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.

दुरूस्ती आणि देखभालीच्या कालावधीत स्मशानभूमीतील यंत्रसामग्रीची स्वच्छता, तपासणी आदी तांत्रिक कामे केली जाणार आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगरपालिकेतर्फे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मृत पाळीव प्राणी आणि इतर प्राण्यांसाठी अंत्यसंस्कार सेवा विनाअडथळा सुरू राहावी, यासाठी महालक्ष्मी आणि देवनार या दोन्ही ठिकाणच्या सुविधा या कालावधीत उपलब्ध राहतील.

देखभालीचे काम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर १२ जुलैपासून मालाड प्राणी दहन सुविधा पूर्ववत सुरू होणार आहे. दहनवाहिनी तात्पुरती बंद केल्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या आवश्यक त्या पर्यायी व्यवस्था वापराव्यात, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.