मुंबई : मागील काही दिवसांपासून मालाड येथील काही गृहसंकुलात बिबट्यांचा वावर वाढला असून त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मालाड येथील एका गृहसंकुलाच्या परिसरात

मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा बिबट्या आढळून आल्याने तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून याबाबत वनविभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गृहसंकुल परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

मालाड पूर्व येथे आयटी पार्कच्या शेजारी रहेजा हाईट्स नावाचे गृहसंकुल आहे. या संकुलातील वाहनतळाच्या परिसरात मंगळवारी पहाटे ३ ते ४ या वेळेच्या दरम्यान बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्हीमुळे समोर आले आहे. या संकुलात सातत्याने बिबट्याचा वावर असल्याने गृहसंकुलातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरातील गृहसंकुलात बिबट्यांचा वावर वाढला आहे.

विशेषतः सायंकाळी ७ नंतर या परिसरात बिबट्यांचा वावर असतो, असे तेथील रहिवाशांनी सांगितले. रहिवाशांकडून याबाबत उपाययोजना करण्याची मागणी येथील करण्यात आली होती. वनविभागाकडून मार्चच्या शेवटच्या आठवड्यात या गृहसंकुल परिसरात जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. तसेच रहिवाशांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या. आवश्यक त्या

उपाययोजना केल्यानंतरही बिबट्याचा वावर कमी झाला नाही तर वनविभागाच्या नियमांनुसार बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येईल असे वनविभागाकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतच या परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहिवासी चिंतेत असून बिबट्यामुळे या परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

बिबट्यामुळे आमच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे रहेजा हाईट्स गृहसंकुलातील रहिवासी विजयकुमार बोरा यांनी सांगितले. याबाबत वनविभागाला कळविण्यात आले असून वनविभागाकडून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करून गृहसंकुलात पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यात यावे, तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी यांनी एकत्र येऊन यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी बोरा यांनी केली आहे.

याबाबत वनविभागाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आला आहे. तसेच सकाळी आणि रात्री उशिरापर्यंत नियमित गस्त घालण्यात येत आहे. तसेच रहिवाशांनी अंधारात एकटे बाहेर पडणे टाळावे, पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात यावी तसेच पाळीव प्राण्यांना एकटे सोडू नये, अशा सूचना वनविभागाकडून देण्यात आल्या आहेत.