मुंबई : मालाड येथील मढ – मार्वे मार्गावरील योगा आश्रमनजीकच्या दाना पाणी भुलार स्टुडिओला शुक्रवारी पहाटे ६ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, स्टुडिओतील सर्व सामान जळून खाक झाल्याने प्रचंड वित्तहानी झाली.
भुलार स्टुडिओतील सुमारे तीन हजार चौरस फूट जागेत आग पसरली होती. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलिस, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अक्राळविक्राळ रूप धारण केलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दुर्घटनास्थळी तैनात करण्यात आल्या. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने सकाळी ६.४८ च्या सुमारास आग भीषण स्वरूपाची (वर्दी क्रमांक १) असल्याचे घोषित केले. एकमजली बांधकाम असलेल्या या स्टुडिओच्या पाच ते सहा गाळ्यांमध्ये आग लागली होती. आगीत विद्युत यंत्रणा, विजेच्या तारा, वॉलपेपरचा साठा, फोम मॅट्रेस, कार्पेट, पीव्हीसी शीट्स, लाकडी फर्निचर, परफ्यूम, ऑफिस फर्निचर, कार्यालयीन कागदपत्रे, शूटिंगचे साहित्य, वातानुकूलित यंत्रणा, बांबू आदी सामान जळून खाक झाले. अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत सकाळी ९.१२ च्या सुमारास आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
भुलार स्टुडिओ हे मुंबईतील मालाड येथील मढ आयलंड भागातील एक अतिशय प्रसिद्ध आणि जुने चित्रीकरण स्थळ आहे. २००५ मध्ये सुरू झालेले हे ठिकाण विशेषतः हिंदी टीव्ही मालिका आणि बॉलिवूड चित्रपटांच्या शूटिंगसाठी ओळखले जाते. या स्टुडिओमध्ये हॉस्पिटल, पोलिस ठाणे, न्यायालय आणि मंदिर यासारखे कायमस्वरूपी सेट्स उपलब्ध आहेत. या स्टुडिओच्या अगदी जवळ दाणा पाणी हा प्रसिद्ध समुद्रकिनारा असल्याने बाह्य दृश्यांच्या चित्रीकरणासाठी ही जागा अधिक सोयीस्कर ठरते. मढ आयलंडमधील शांत वातावरण आणि निसर्गरम्य परिसरामुळे अनेक बड्या प्रॉडक्शन हाऊसेसची ही पहिली पसंती असते.
