मुंबई : मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात अनधिकृत अथवा मान्यता नसलेल्या १४ शाळा सुरू राहिल्याच कशा ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला. तसेच, या शाळांना परिस्थिती कायम ठेवण्याची संधी संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी कोणत्या परिस्थितीत दिली याची तपासणी करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
त्याचवेळी, या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्ष मध्येच विस्कळीत होऊन त्यांचे अपरिमित नुकसान होऊ नये याबाबत मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने चिंता व्यक्त केली. नाझीर बशीर खान यांनी याप्रकरणी जनहित याचिका करून मालवणी येथील १४ शाळा तातडीने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईच्या कायदेशीर वैधतेला आव्हान दिले आहे. या शाळांविरोधात गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी झालेल्या सुनावणीच्या वेळी, नव्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ नयेत, अशा सूचना अनधिकृत संस्था आणि शाळांना वेळोवेळी नोटिसांद्वारे देण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांनंतरही संबंधित शाळांकडून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून त्यांचे शिक्षणही सुरू आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली. तसेच, संबंधित शाळा अनधिकृत असून त्यांना मान्यता नसल्याची भूमिकाही महापालिकेतर्फे मांडण्यात आली. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी संबंधित सक्षम प्राधिकरणाला सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले. त्यात संबंधित शाळांची सद्यःस्थिती आणि त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
या शाळांचा सगळा तपशील सादर करा
संबंधित १४ शाळांना अधिकृत मान्यता आहे की नाही ? तसेच त्या अनुदानित, विनाअनुदानित किंवा अन्य प्रकारातील आहेत का ? प्रत्येक शाळेत सध्या किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ? संबंधित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांची संख्या किती ? शाळा कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाशी संलग्न आहेत का ? संबंधित शाळा कोणत्या तारखेपासून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत ? या तपशीलासह शाळा किंवा त्यांच्या व्यवस्थापनाविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईची माहितीही प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवणे शक्य आहे का ?
न्यायालयाने या शाळांतील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मुद्दा प्रामुख्याने अधोरेखीत केला. संबंधित शाळा अनधिकृत असल्याची महापालिकेची भूमिका असली, तरी तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष मध्येच विस्कळीत होऊ नये, यासाठी काही सवलत देता येईल का ? याचीही तपासणी करायची असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. चालू शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाल्यास त्याचे गंभीर आणि भरून न निघणारे नुकसान होऊ शकते, अशी चिंता खंडपीठाने व्यक्त केली. त्यामुळे प्रकरणाच्या गुणदोषांवर अंतिम विचार करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे हित आणि शाळांच्या कायदेशीर स्थितीचा एकत्रित विचार करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
