मुंबई : मालाड (पश्चिम) येथील मालवणी परिसरातील ”बेकायदा” ठरवलेल्या १४ शाळांतील मुलांच्या शिक्षणाची आम्हाला सर्वाधिक चिंता आहे. त्यामुळे, अनेक वर्षांपासून या ”बेकायदा” शाळांविरुद्ध कारवाई करण्यात प्रशासनाला आलेल्या अपयशाचा फटका विद्यार्थ्यांनी का सहन करावा, असा प्रश्न उपस्थित करून मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या शाळा मार्च २०१७ पर्यंत सुरू ठेवण्याबाबत विचार करा, असे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी महापालिकेला दिले. शाळा मान्यताप्राप्त नसल्याचे स्पष्ट झाल्यास या मुदतीनंतर बंद करा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
या शाळा मान्यताप्राप्त नसल्या तरी एखाद्याला बेघर केल्यासारख्या त्या अचानक बंद करून विद्यार्थ्यांना उद्यापासून दुसऱ्या शाळेत जाण्यास सांगता येणार नाही, ही संक्रमण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने झाली पाहिजे. आम्हाला विद्यार्थ्यांची चिंता अधिक आहे, त्यांच्या मानसिकेचा विचार झालाच पाहिजे. महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये, असे निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने महापालिकेला उपरोक्त आदेश देताना नोंदवले. त्याचवेळी, जवळच्या मान्यताप्राप्त शाळांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची व्यवस्था करण्याबाबतही महापालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
आवश्यक परवानग्या नसलेल्या या शैक्षणिक संस्था अनिश्चित काळासाठी ठेवण्याची परवानगी देता येणार नाही. परंतु, प्रशासनाच्या वेळीच कारवाई न करण्याच्या अपयशामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण भरडले जाऊ नये. आम्हाला विद्यार्थ्यांची सर्वाधिक चिंता असून त्यांचे सुरू शैक्षणिक वर्ष विस्कळित होऊ नये, तसे घडल्यास त्यांचे कधीही भरून न येणारे शैक्षणिक नुकसान होईल याचा न्यायालयाने पुनरूच्चार केला.
तत्पूर्वी, २०१९ पासून या शाळांना दरवर्षी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, असे महापालिकेने न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच, या १४ शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षासाठी जवळच्या महानगरपालिका शाळांमध्ये सामावून घेतले जाऊ शकते. या शाळा बंद केल्या पाहिजेत आणि तेथील विद्यार्थ्यांना महानगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित किंवा खासगी शाळांमध्ये हलवले पाहिजे, अशी भूमिकाही महापालिकेने मांडली. त्यावर, प्रशासनाला अनेक वर्षांपासून या शाळांच्या कामकाजाची माहिती होती, तर आतापर्यंत कोणतीही कठोर कारवाई का केली नाही? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. नोटिशीनंतर शाळांवर कारवाई करायला हवी होती आणि विद्यार्थ्यांना अचानकपणे त्यांच्या शाळेतून विस्थापित व्हावे लागणार नाही हे प्रशासनाने सुनिश्चित केले पाहिजे होते, असेही न्यायालयाने सुनावले.
दुसरीकडे, इतक्या कमी कालावधीत विद्यार्थ्यांना अन्य शाळेत कसे हलवता येईल ? असा प्रश्न याचिकाकर्ते नाझीर खान यांच्या वतीने युक्तिवाद करताना उपस्थित करण्यात आला. या परिसरात विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासारखी कोणतीही नवीन महानगरपालिका शाळा उपलब्ध नाही, असेही याचिकाकर्त्यांनी सांगितले. त्याची दखल घेऊन, न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना परिसरातील अशा मान्यताप्राप्त शाळा शोधण्याचे आदेश दिले. तसेच, विद्यार्थ्यांच्या चालू शैक्षणिक सत्रात कोणताही व्यत्यय येऊ नये हे सुनिश्चित करणे हा आपला सध्या मूळ उद्देश आहे. या संस्थांसाठी मान्यताविषयक अटी शिथिल करण्याच्या व्यापक सध्या विचाराधीन नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
प्रकरण काय ?
मालवणी येथील १४ शाळा बेकायदा ठरवून त्या तातडीने बंद करण्याबाबत महापालिकेने बजावलेल्या नोटिशीला नाझीर खान यांनी जनहित याचिकेमार्फत आव्हान दिले आहे.
