मुंबई : मागील काही वर्षात अमली पदार्थांची तस्करी वाढली असून नुकताच केलेल्या कारवाईत खुद्द पोलीस दलातील कर्मचाऱ्यालाच अमली पदार्थाची खरेदी करताना अटक करण्यात आली. मालवणी पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपीने अमली पदार्थाची खरेदी केल्याचे तपासात उघड झाले. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

मालवणी परिसरात गेट क्रमांक ८ येथे पोलिसांनी अमली पदार्थाच्या तस्करीसंबंधी कारवाईसाठी एक सापळा रचला होता. यावेळी तस्करांच्या टोळीविषयी अधिक माहिती मिळविण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीला तोतया अमली पदार्थ विक्रेता म्हणून त्या पसरीसरात तैनात केले होते.

याचदरम्यान एक व्यक्ती तेथे अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी आली. त्या व्यक्तीने आपल्याला मेफड्रॉन म्हजेच ‘म्याऊ म्याऊ’ हवे असल्याचे सांगितले. तसेच चार ग्रॅम मेफेड्रोनसाठी त्याने १५ हजार रुपये रोख रक्कमही देऊ केली. याचदरम्यान पोलिसांच्या पथकाने सापळा रचला होता. पथकाने अमली पदार्थाची खरेदी करणाऱ्या त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.

आणि पोलीस दलातील कर्मचारी असल्याचे निषपन्न…

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला पोलिसांना आपण ज्याला अटक केली आहे ती व्यक्ती पोलीस दलातील असल्याबाबत कोणतीही माहिती नव्हती. आरोपीची अधिक चौकशी केली असता तो पोलीस दलातील कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले. किरण इंदुलकर असे या आरोपीचे नाव असून तो जोगेश्वरी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. याआधी तो मालाड परिसरातील मालवणी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

इंदुलकर तस्करांच्या टोळीशी संपर्कात असल्याचा संशय…

इंदुलकर मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्याचा अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीशी संबंध आला असावा, असा संशय मालवणी पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, इंदुलकर हा नायगाव येथील बीडीडी चाळ येथील रहिवासी आहे. यापूर्वीही त्याच्यासंबंधी काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी इंदुलकरला निलंबितही करण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, इंदुलकर याचा अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीशी संबंध आहे का किंवा इतर कुणी व्यक्तींच्या सहभागाविषयी मालवणी पोलीस अधिक तपास करत आहेत.