मुंबई : मालाड (पूर्व) येथील एका क्लिनिकमध्ये ८० वर्षीय वृद्धाचा मृतदेह गेल्या चार वर्षांपासून डीप फ्रीझरमध्ये जतन करून ठेवल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विज्ञानाच्या साहाय्याने भविष्यात मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येईल या ‘क्रायोनिक्स’ संशोधनावरील विश्वासापोटी आणि वडिलांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मुलांनी हा प्रकार केल्याचे समोर आले.
कुरार पोलिसांना २९ सप्टेंबर रोजी रात्री या प्रकाराची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि सर्व वैद्यकीय कागदपत्रांची बारकाईने पडताळणी केली. मृत्यू नैसर्गिक कारणांमुळेच झाल्याचे स्पष्ट झाल्याने आणि या प्रकरणात कोणताही घातपात किंवा गुन्हेगारी हेतू नसल्याने पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही.
कौटुंबिक दुःख आणि कायदेशीर बाबी लक्षात घेऊन पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन केले. पोलिसांनी कायद्याची आणि वास्तवाची जाणीव करून दिल्यानंतर मुलांनी अंत्यसंस्कारास संमती दर्शवली. अखेर १ ऑक्टोबर रोजी पोलिसांच्या उपस्थितीत वृद्धाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृतदेह जतन करण्यासाठी सुमारे २७ ते ५० लाख रुपये खर्च
संबंधित ८० वर्षीय वृद्धाचा २०२२ मध्ये कर्करोग आणि मूत्रपिंड विकाराने मृत्यू झाला. त्यावेळी उपचारादरम्यान डॉक्टरांनी रीतसर मृत्यूचा दाखलाही जारी केला. मात्र, वृद्धाच्या मुलांनी वडिलांचा मृत्यू स्वीकारण्यास नकार दिला. भविष्यात प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मृतदेहात पुन्हा प्राण फुंकता येतील या ”क्रायोनिक्स” तंत्रज्ञानावर त्यांचा विश्वास होता. हा मृतदेह अमेरिकेतील ‘क्रायोनिक्स सेंटर’ मध्ये पाठवण्याची त्यांची योजना होती आणि त्यासाठी त्यांनी एका क्लिनिकमध्ये विशेष डीप फ्रीझरची व्यवस्था करून मृतदेह जतन करण्यासाठी सुमारे २७ ते ५० लाख रुपये खर्च केले होते.
