‘डे केअर सेंटर लवकरच सुरू होत आहे,’ असा बोर्ड मुंबईतील एका इमारतीबाहेर लागलेला होता. पण, या बोर्डच्या खालील लोखंडी गेट बंद होते, आत जाण्या-येण्याचा मार्ग बंद होता. काही दिवसांपासून या इमारतीमधून तीव्र दुर्गंधी येत होती. यामुळे हैराण झालेल्या शेजाऱ्यांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण होते. जसजसे दिवस जाऊ लागले, तसतशी दुर्गंधी अधिक तीव्र होत गेली.

दुर्गंधी वाढल्यानंतर शेजाऱ्यांकडून तक्रार

दरम्यान, दुर्गंधी सहन करण्यापलीकडे गेली, तेव्हा शेजाऱ्यांनी अखेर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गेट उघडले असता, धक्कादायक प्रकार समोर आला. खोलीत तपासणी केली असता पोलिसांना एक मृतदेह आढळून आला. मुंबईतील मालाड पूर्व भागातील एका बंद डे केअर सेंटरमध्ये घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. परिसरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

नेमके प्रकरण काय?

पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, संबधित व्यक्तीचा मृत्यू जून २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला होता. आपल्या वडिलांना नेहमी आपल्या जवळ ठेवण्याची इच्छा असलेल्या त्यांच्या मुलीने, वडिलांचे पार्थिव जतन करण्याचा निर्णय घेतला.

वडिलांवर अंत्यसंस्कार न करता, त्या महिलेने परदेशातील एका कंपनीची मदत घेऊन वडिलांचा मृतदेह प्रिझर्व्ह केला होता. वडिलांप्रति असलेल्या अतीव प्रेमापोटीच तिने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

पुढील कायदेशीर कारवाई

या प्रकरणी संबंधित महिलेने कायदेशीर बाजू मांडण्यासाठी वकिलांची मदत घेणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कुरार पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यातील कायदेशीर आणि कौटुंबिक बाजू तपासल्या जात आहेत.