तपासचक्र : विवानच्या हत्येचे गूढ

विवानची हत्या होईल वा त्याचा मृतदेह आढळेल, असे पोलिसांना त्या वेळी अजिबात वाटले नव्हते.

mumbai crime
प्रतिनिधिक छायाचित्र

 

दोन वर्षांचा विवान काकीकडे खेळायला बाहेर पडला तो परतलाच नाही. त्याचा मृतदेहच पोलिसांच्या हाती लागला. त्या चिमुकल्याची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी आपल्या आजवरच्या तपासाचा अनुभव लक्षात घेऊन विवानच्या काकीला ताब्यात घेतले; पण अजूनही तिनेच विवानची हत्या केली का आणि कशी केली, हे उलगडलेले नाही.

मालाड पश्चिमेला असलेल्या काचपाडा परिसरात राहणाऱ्या कंडू दाम्पत्याचा दोन वर्षे वयाचा विवान हा गोंडस मुलगा सायंकाळी तेथे जवळच राहत असलेल्या चुलत काकीकडे खेळायला गेला आणि तो परत आलाच नाही. विवान आपल्याकडे आला खरा, परंतु त्याला पुन्हा घरी नेऊन सोडले, असे त्याची चुलत काकी सांगत होती. विवानला घरी सोडले, मग तो गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

मालाड परिसरातच दुकान चालविणारे विवानचे बाबा संदीप कंडू सायंकाळी साडेसात वाजता घरी आले तेव्हा नेहमीच्या सवयीप्रमाणे विवान दिसला नाही म्हणून त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांना कळले की, तो चुलत काकीकडे खेळण्यासाठी गेला आहे. चुलत काकीकडे विवानने जावे यात नवीन काहीही नव्हते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु विवानची तब्येत बरी नव्हती म्हणून त्याला डॉक्टरकडे न्यायचे होते. त्यामुळे ते जेमतेम २५ मीटर अंतरावर राहणाऱ्या इंदू गुप्ता हिच्या घरी पोहोचले; परंतु विवान आपल्याकडे नाही, असे इंदूने सांगितले. विवानला मी पाच वाजता घरी आणले होते आणि अर्ध्या तासात म्हणजे साडेपाच वाजता त्याला पुन्हा घरी सोडले; परंतु विवान घरी आलाच नाही, हे सांगताच इंदूही त्यांच्यासोबत विवानच्या शोधासाठी बाहेर पडल्या.

संदीप यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. विवान येथेच कोणाकडे तरी असेल या आशेने ते सर्वत्र फिरत होते; परंतु तो कुठेही सापडला नाही. काही केल्या शोध लागत नसल्यामुळे अखेरीस मालाड पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. मालाड पोलिसांनी विवान हरविल्याची तक्रार दाखल करून तपास सुरू केला. उपायुक्त विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुधीर महाडिक यांच्या पथकाने चौकशी सुरू केली. अनेक पथके विवानच्या शोधासाठी परिसर पालथा घालत होते. स्निफर श्वानाच्या मदतीने शोध घेत असलेल्या पथकाला त्याच परिसरात पहाटे साडेतीन वाजता एका गोणीभोवती श्वान बराच वेळ घुटमळत असल्याचे जाणवले. त्यामुळे गोणी ताब्यात घेतल्यावर त्यात विवानचा मृतदेह आढळल्यामुळे पथक चक्रावून गेले.

विवानची हत्या होईल वा त्याचा मृतदेह आढळेल, असे पोलिसांना त्या वेळी अजिबात वाटले नव्हते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन ते तीन पथके रात्रभर त्याचा शोध घेत होते; परंतु त्याचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. गळा दाबून विवानची हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले नव्हते. कंडू कुटुंबीयांचे कोणाशी शत्रुत्व होते का, हा धागा पकडून सुरुवातीला तपास सुरू झाला; परंतु त्याबाबत काहीही दुवा मिळाला नाही. दुसऱ्या पथकाकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू होती; परंतु झोपडपट्टीवजा काचपाडा परिसरातून विवान बाहेर गेल्याचे आढळले नाही वा बाहेरून गोणी आणूनही कोणी तेथे टाकली नव्हती. म्हणजे मारेकरी या परिसरातीलच असावा, याची पोलिसांना खात्री पटली. त्यामुळे काही गर्दुल्ल्यांनाही उचलण्यात आले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतरही काहीही दुवा मिळाला नाही. विवानची हत्या कोणी केली आणि का केली हे कोडे कायमच होते.

विवानची आई सोनी आणि तिची चुलत नणंद इंदू यांच्यात विस्तव जात नव्हता, अशी माहिती तोपर्यंत पोलिसांना मिळाली होती. या हत्येशी या वादाचा काही संबंध आहे का, असा नवा दुवा पोलिसांच्या तपासात आता आला होता; परंतु त्याबाबत खात्री नव्हती. त्यामुळे साध्या वेशात पोलिसांनी तपास सुरू केला. यातून बरीच माहिती बाहेर आली. या दोघी ज्या ज्या वेळी भेटत तेव्हा त्यांच्यात कडाक्याचे भांडण होत असे. असा एकही दिवस गेला नाही की, त्यांच्यात भांडण झाले नाही. सोनीचा अपमान करण्याची संधी एकदाही इंदू सोडत नसे. उत्तर प्रदेशात लग्नासाठी गेलेले असताना या दोघींमध्ये आरसा धरण्यावरून भांडण झाले होते. भाच्याकडेही ती सोनीबद्दल खूपच वाईट बोलत असे. घरातून चालती हो, असे सांगून तिने सोनीचा अपमानही केला होता. इतकेच नव्हे तर मुंबईत परतताना ट्रेनमध्ये खिडकीजवळ बसण्यावरूनही दोघांमध्ये झालेले भांडण टोकाला गेले होते. त्या वेळी इंदू जाहीरपणे म्हणाली होती की, येत्या काही दिवसांत काही तरी अशी मोठी घटना घडेल की त्याचे पडसाद आयुष्यभर उमटतील. हाच दुवा पकडून तपासाने वेग घेतला. इंदूच्या घरापासून फक्त चार मीटरवर विवानचा मृतदेह सापडला होता. परिस्थितीजन्य पुराव्यावरून मालाड पोलिसांनी खात्री पटली की, इंदूनेच विवानची हत्या केली आहे. त्यामुळे तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले; परंतु शेवटपर्यंत इंदूने हत्येची कबुली दिली नाही. परिस्थितीजन्य पुरावे तिच्याविरुद्ध असल्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली. ती अद्याप तुरुंगात आहे; परंतु विवानची हत्या तिने कशी आणि कुठे केली, हे पोलिसांनाही कळू शकलेले नाही. त्यामुळे तपास करणारे अधिकारीही अद्याप अस्वस्थ आहेत. कोणी तरी येईल आणि विवानच्या हत्येमागील खरे गूढ उकलेल, अशा आशेवर ते आहेत.

निशांत सरवणकर

@ndsarwankar

nishant.sarvankar@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Malad police arrested aunt indu kandu for killing 2 year old vivan