मुंबई : पश्चिम रेल्वेवरील मालाड रेल्वे स्थानकात लोकलमधून उतरत असताना झालेल्या भांडणानंतर एका ३३ वर्षीय प्राध्यापकावर हल्ला करण्यात आला. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. कांदिवली येथे राहणारे आलोक कुमार सिंग हे विलेपार्ले येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला.
हल्लेखोराला पकडण्यासाठी बोरिवली रेल्वे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. शनिवारी चर्चगेट-बोरिवली धीम्या लोकलने आलोक कुमार सिंग प्रवास करत होते. यावेळी सिंग आणि हल्लेखोरात वाद झाला. त्यानंतर मालाड स्थानकात उतरून टोकाचे भांडण झाले.
हल्लेखोराने खिशातून धारदार शस्त्र काढून सिंगवर वार केले. हल्लेखोराने त्यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला वार केले. ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. तो फलाटावर कोसळला. त्याला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बोरिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून फरार हल्लेखोराचा शोध सुरू आहे, असे लोहमार्ग पोलीस पश्चिम परिमंडळाच्या पोलीस उपायुक्त सुनीता साळुंके-ठाकरे यांनी सांगितले.
