मुंबई : मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी अवघे पाच रुपये शुल्क भरावे लागेल, असे सांगत निवडणूक आयोगाचा अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या सायबर भामट्याने मालाड पश्चिम येथील ज्येष्ठ दाम्पत्याची ६ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केली. पत्नीच्या मतदार ओळखपत्रातील कथित त्रुटी दूर करण्याच्या बहाण्याने भामट्याने पतीशी संपर्क साधला. बँकिंग अॅपशी संबंधित संकेतांक मिळवल्यानंतर त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आली. या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, आरोपीचा शोध घेण्यासह पुढील तपास सुरू आहे.
मालाड पश्चिम येथे राहणारे ७९ वर्षीय निवृत्त कंपनी संचालक आणि त्यांची ७६ वर्षीय पत्नी या फसवणुकीचे बळी ठरले. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास संबंधित व्यक्तीला समाजमाध्यमावर दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्याने आपण भारतीय निवडणूक आयोगाचा अधिकारी असल्याची ओळख करून दिली. त्यानंतर तक्रारदाराच्या पत्नीच्या मतदार ओळखपत्रात त्रुटी असल्याचे सांगून ती ऑनलाइन दुरुस्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले.
ही दुरुस्ती करण्यासाठी केवळ पाच रुपये शुल्क भरावे लागेल, असे भामट्याने सांगितले. अत्यल्प रकमेचे शुल्क असल्याने ही प्रक्रिया नियमित आणि अधिकृत असल्याचा विश्वास तक्रारदाराला वाटला. मात्र, या प्रक्रियेच्या नावाखाली भामट्याने त्यांच्या बँकिंग अॅपशी संबंधित संकेतांक मिळवला. तक्रारदाराने हा संकेतांक दिल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ६ लाख ४८ हजार रुपये काढण्यात आले. पाच रुपये शुल्काच्या बहाण्याने सुरू झालेल्या या व्यवहारातून खात्यातील मोठी रक्कम गेल्याने तक्रारदाराची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार नोंदणी संकेतस्थळावर तक्रार दाखल केली. त्यानंतर बांगूर नगर पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याची खोटी ओळख वापरून विश्वास संपादन केला आणि त्यानंतर बँकिंग व्यवहाराशी संबंधित माहिती मिळवून रक्कम काढल्याचा प्राथमिक तपशील तक्रारीतून समोर आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास बांगूर नगर पोलीस करत आहेत.
