मुंबई : समुद्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वरळी, धारावी, वांद्रे, घाटकोपर, भांडुप, वेसावे (वर्सोवा) आणि मालाड येथे मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार असून त्यापैकी मालाड केंद्राच्या कामाला आता वेग येणार आहे. कांदळवनाच्या परवानगीअभावी रखडलेल्या या केंद्राला आता परवानगी प्राप्त झाल्याची माहिती पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिली.

समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मालाड येथे उभारण्यात येत असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामांची आश्विनी भिडे यांनी शनिवारी सकाळी पाहणी केली व प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यावेळी उपस्थित होते.

मुंबईत दररोज निर्माण होणारे सांडपाणी समुद्रात सोडले जाते. या सांडपाण्यावर शास्त्रशुद्ध व आधुनिक प्रक्रिया करण्यासाठी पर्यावरणपूरक अशा मलजल प्रक्रिया केंद्रांची उभारणी करण्याचे प्रकल्प मुंबईमध्ये विविध ठिकाणी हाती घेण्यात आले आहेत. वरळी, वांद्रे, मालाड, वर्सोवा, धारावी, घाटकोपर आणि भांडुप अशा एकूण २४६४ द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया सुविधा केंद्रांची कामे सुरू आहेत. ही मलजल प्रक्रिया केंद्रे कार्यान्वित झाल्यानंतर त्यापैकी ५० टक्के सांडपाण्यावर (१२३२ दशलक्ष लिटर लिटर) दुय्यम प्रक्रिया करून समुद्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे समुद्र दूषित होण्याचे प्रमाण कमी होईल. तर दुय्यम प्रक्रिया केलेल्या ५० टक्के पाण्यावर तृतीय स्तरावरील प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे.

कुलाबा येथे प्रतिदिन ३७ दशलक्ष लिटर्स इतक्या क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र बांधून ते एप्रिल २०२० मध्ये कार्यान्वित करण्यात आले. सर्व निर्माणाधीन असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राचे कामकाज विहित कालावधीत पूर्ण करावे आणि ते तत्काळ कार्यान्वित होतील याची काळजी घ्यावी, असे निर्देश आश्विनी भिडे यांनी दिले.

इतर केंद्राच्या तुलनेत मालाड येथील केंद्राचे काम रखडले होते. भिडे यांनी मालाड येथील मलजल प्रक्रिया केंद्राच्या स्थापत्य, तसेच यांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकी कामांचा आढावा घेतला. प्रकल्पाच्या विविध घटकांची सद्यस्थिती, कामाची प्रगती, गुणवत्तेचे निकष, तसेच उर्वरित कामांचे नियोजन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. विविध यंत्रसामग्रीची उभारणी, विद्युत यंत्रणेची उभारणी, प्रक्रिया युनिट्सची कार्यक्षमता आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली. तसेच, प्रत्येक टप्प्यात गुणवत्तेची काटेकोर अंमलबजावणी करत नियोजित मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बायोगॅसपासून वीज निर्मिती

मालाड मलजल प्रक्रिया प्रकल्पामध्ये दररोज ४५४ दशलक्ष लिटर मलजलावर द्वितीय स्तरीय प्रक्रिया केली जाईल. त्यापैकी २२७ दशलक्ष लिटर मलजलावर दररोज पुढील तृतीय स्तरीय प्रक्रिया केली जाईल. या प्रकल्पात प्रक्रियेअंती तयार होणाऱ्या बायोगॅसपासून वीजनिर्मिती आदी कामांचा समावेश असल्याचे आश्विनी भिडे यांनी सांगितले.

दहिसर ते गोरेगावच्या रहिवाशांना फायदा

या प्रकल्पासाठी खारफुटी व कांदळवन काढण्यासाठी विविध परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. नवीन मलजल प्रक्रिया केंद्र सुरू झाल्यानंतर, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुधारणा होईल. तसेच दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरातील लोकसंख्येला याचा फायदा होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.