शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : शहरातील मेट्रोसह अन्य प्रकल्पांमुळेच मागील वर्षांपासून हिवतापाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. २०१९ मध्ये हिवतापाचे ४,३५७ रुग्ण आढळले होते, तर यावर्षी ऑक्टोबरमध्येच साडेचार हजारांवर हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत. मृतांची संख्या शून्य आहे.

शहरात २०१२ मध्ये वर्षांला १६ हजार ०८६ रुग्ण आढळले होते, तर ४५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. परंतु पालिकेने वेळोवेळी मलेरिया नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे २०१३ पासून यात मोठय़ा प्रमाणात घट व्हायला सुरुवात झाली. २०१८ पासून तर वार्षिक रुग्णसंख्या पाच हजारांपर्यंत कमी झाली. २०२० मध्ये करोना साथीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे लक्ष केंद्रित झाल्यामुळे पुन्हा एकदा हिवतापाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. २०२० मध्ये हिवतापाच्या रुग्णसंख्येने पुन्हा एकदा पाच हजारांचा आकडा पार केला. यावर्षी ऑक्टोबरमध्येच ४ हजार ५७९ रुग्ण आढळले. २०१९ मध्ये मात्र शहरात हिवतापामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. २०२० मध्ये एक मृत्यू झालेला होता, तर यावर्षीही शून्य मृत्यू आहे.

गेल्यावर्षी टाळेबंदीमुळे अनेक बांधकाम मजूर गावाकडे परतले. अनेक प्रकल्पांचे बांधकाम या काळात बंद होते. परिणामी, या ठिकाणी पाणी साचल्यामुळे डासांची पैदास जास्त प्रमाणात वाढली. २०२० मध्ये हिवतापाच्या डासांची सर्वाधिक उत्पत्ती स्थाने ही मेट्रो स्टेशनच्या बांधकामांच्या ठिकाणी आढळली होती. याही वर्षी हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत उपनगरांपेक्षा शहरातील विभागांमध्येच आढळले आहेत. यात बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांचे प्रमाण अधिक आहे. मेट्रोसह अनेक प्रकल्पांचे कामकाज सुरू असल्यामुळे येथे पाणी साचते आणि अशी ठिकाणे डासांची पैदास वाढण्यासाठी पोषक असतात. बांधकाम करणाऱ्या मजुरांमध्ये मलेरियाचा पॅरासाइट असण्याची जास्त शक्यता असते. या ठिकाणांमध्ये वाढलेल्या डासांमुळे हिवतापाचा प्रसार अधिक प्रमाणात होतो, अशी माहिती पालिकेच्या कीटक नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. राजन नारिंग्रेकर यांनी दिली.

सर्वेक्षण सक्षम करणे आवश्यक

हिवतापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केवळ डासांची उत्पत्ती रोखणे पुरेसे नाही. बाधितांचा शोध घेऊन तपासण्या करणे, औषधोपचार पूर्ण करणे आवश्यक आहे. कारण डासांमध्ये हिवतापाचा परजीवी हा बाधित व्यक्तीमार्फतच येतो. त्यामुळे हिवताप नर्मूलनासाठी सर्वेक्षण सक्षमतेने करणे गरजेचे आहे.  डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु तेथील बाधितांच्या शरीरात हिवतापाचे निर्मूलन पूर्णपणे झाले आहे का याच्या पुन्हा तपासण्या केल्या जात नाहीत. त्यामुळे एखाद्या रुग्णांमध्ये हा परजीवी राहिल्यास  त्याचा पुन्हा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे मत पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

गेल्यावर्षी करोना साथीमध्ये मलेरिया नियंत्रणाकडे अधिक लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे प्रादुर्भावाचे प्रमाण वाढले. शहरात हिवताप काही वर्षांपासून हा अंतर्जन्य स्थितीमध्ये आहे. यावर्षी नियंत्रणावर लक्ष दिले असले तरी शहरात अनेक ठिकाणी असलेल्या विहिरी, मोकळी रेल्वे यार्ड, वाढती बांधकामे यामुळेही संसर्गाचे प्रमाण वाढत आहे.

 – डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका