मुंबई : भारतीय पर्यटकांना डिसेंबर २०२७ पर्यंत मलेशियात व्हिसामुक्त प्रवास करता येणार आहे. भारतीय पर्यटकांची वाढती संख्या पाहता मलेशियाने व्हिसाला मुदतवाढ दिली आहे. डिसेंबर २०२६पर्यंत मलेशिया भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा मुक्त आहे. ट्रॅव्हल फिनटेक कंपनी स्केपिया आणि टुरिझम मलेशिया यांनी ‘मलेशिया कॉलिंग’ ही चार महिन्यांची मोहीम सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे.

मलेशिया हे भारतीय आणि जगभरातील पर्यटकांचे एक अत्यंत आवडते आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. आधुनिक शहरे, आकाशाला भिडणाऱ्या इमारती, शांत-सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन वर्षावने आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा या सर्वांचा अप्रतिम मेळ मलेशियामध्ये पाहायला मिळतो. इतर आंतरराष्ट्रीय देशांच्या तुलनेत मलेशियाची सफर बजेटमध्ये आणि स्वस्त होत असल्याने अनेकांसाठी ती पहिली पसंती असते. डिसेंबर २०२३ मध्ये भारतीय नागरिकांसाठी व्हिसामुक्त प्रवेश सुरू झाल्यापासून, भारताने मलेशियासाठी एक महत्त्वपूर्ण स्रोत बाजारपेठ म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत ९ लाख ६२ हजार ९८३ पर्यटकांनी मलेशियाला भेट दिली.

ऑक्टोबर २०२६ पर्यंत १० पेक्षा जास्त भारतीय शहरांमधून १९३ साप्ताहिक थेट विमानसेवा उपलब्ध असल्याने क्वालालंपूर, लँगकावी आणि पेनांग शहरात जाता येते. स्कापियावर मलेशियाकरिता विमान बुकिंगमध्ये जवळपास ४ पट, तर राहण्याच्या बुकिंगमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. स्केपिया प्लॅटफॉर्मद्वारे पर्यटकांना सबाह, सारावाक, पेनांग, मेलाका आणि लँगकावी या शहरातील मलेशियाची संस्कृती, निसर्ग पाहता येणार आहे.

टुरिझम मलेशियासोबतच्या भागीदारीद्वारे, विमान प्रवास, निवास व अनुभवांवरील रिवॉर्ड्स आणि ऑफर्सच्या माध्यमातून पर्यटकांना चांगला अनुभव घेता येऊ शकतो. – आनंद कंददाई, स्केपियाचे धोरणात्मक आणि प्रवास भागीदारी प्रमुख

“भारत ही मलेशियाच्या सर्वात महत्त्वाच्या पर्यटन बाजारपेठांपैकी एक आहे. मलेशिया प्रत्येक प्रवाशासाठी काही तरी खास देते. टुरिझम मलेशिया आणि स्कॅपिया यांच्यातील भागीदारीद्वारे, अधिक भारतीय प्रवाशांना मलेशियाच्या विविध आकर्षणांची ओळख होणार आहे. – नज्वा मुसिरिफा रामली, कॉन्सुल जनरल मलेशिया,मुंबई

बदलता कल

स्केपियाच्या बुकिंग ट्रेंड्समधून नेहमीच्या प्रवासमार्गाच्या पलीकडे जाऊन मलेशियाला भेट देण्यात पर्यटकांची आवड वाढत आहे. क्वालालंपूर व लँगकावीमध्ये बुकिंगचा मोठा वाटा असला तरी, प्रवासी थीम पार्क व केबल कारपासून ते मत्स्यालय, शहर दौरे आणि जेवणाच्या अनुभवांपर्यंत सर्वकाही बुक करत आहेत. जेंटिंग हाय लँड्स, पेनांग आणि जॉर्ज टाऊनमध्येही बुकिंग वाढत आहे.