scorecardresearch

मालेगाव बॉम्बस्फोट खटला : विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदलीस विरोध

खटल्याशी संबंधित सगळय़ांनाच त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली आहे आणि खटल्याचे निष्पक्ष आणि स्वतंत्र पद्धतीने कामकाज चालवले आहे.

मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचे कामकाज पाहणारे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. सित्रे यांची अन्यत्र बदली करण्याऐवजी त्यांनाच या खटल्याचे कामकाज चालवू द्या, अशी मागणी करणारे पत्र पीडितांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायालयाच्या महानिबंधकांना लिहिले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाचे न्या. सित्रे यांची येत्या उन्हाळी सुट्टीदरम्यान वार्षिक सामान्य बदल्यांनुसार बदली करण्यात आली आहे. परंतु न्या. सित्रे हे ऑगस्ट २०२० पासून या खटल्याचे कामकाज पाहत आहेत. आरोपींकडून खटल्याला हेतुत: केल्या जाणाऱ्या विलंबाला न जुमानता न्या. सित्रे हे या खटल्याचे दररोज कामकाज चालवत आहेत. त्यामुळे त्यांची बदली करण्याऐवजी त्यांनाच खटल्याचे कामकाज चालवू द्या, असे पीडितांच्या कुटुंबीयांनी पत्रात लिहिले आहे.

न्या. सित्रे हे नैसर्गिक न्याय आणि निष्पक्ष खटल्याच्या तत्त्वांचे समर्थन करणारे, नि:पक्षपाती आहेत. त्यांनी खटल्याशी संबंधित सगळय़ांनाच त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली आहे आणि खटल्याचे निष्पक्ष आणि स्वतंत्र पद्धतीने कामकाज चालवले आहे. त्यांना खटल्याबाबत आणि खटल्यातील प्रत्येक कागदपत्रे, पुराव्यांबाबत माहिती आहे. त्यांनी १०० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. अशावेळी नव्या न्यायाधीशाकडे खटला वर्ग झाल्यास त्यांना खटल्याच्या, त्याच्या कागदपत्रांचा सुरूवातीपासून अभ्यास करावा लागेल,

असा दावाही पत्रात करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Malegaon blast victims write to bombay hc chief justice against transfer of judge zws

ताज्या बातम्या