scorecardresearch

मालेगाव बॉम्बस्फोट खटला : आणखी एक साक्षीदार फितूर; फितुरांची संख्या तीसवर

साक्षीदाराची खटल्यातील प्रमुख आरोपी ले. कर्नल प्रसाद पुरोहित याने गोपनीय माहिती देण्यासाठी नियुक्ती केली होती. परंतु, या साक्षीदाराने साक्ष फिरवल्याने खटल्यातील फितूर साक्षीदारांची संख्या ३० झाली आहे.

Malegaon Bomb Blast witness testimony
मालेगाव बॉम्बस्फोट खटला : आणखी एक साक्षीदार फितूर (image – pixabay)

मुंबई : मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात आणखी एका साक्षीदाराला विशेष न्यायालयाने मंगळवारी फितूर घोषित केले. या साक्षीदाराची खटल्यातील प्रमुख आरोपी ले. कर्नल प्रसाद पुरोहित याने गोपनीय माहिती देण्यासाठी नियुक्ती केली होती. परंतु, या साक्षीदाराने साक्ष फिरवल्याने खटल्यातील फितूर साक्षीदारांची संख्या ३० झाली आहे.

या साक्षीदाराने २००८ मध्ये प्रकरणाचा त्यावेळी तपास करणाऱ्या राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) जबाब नोंदवला होता. परंतु, विशेष न्यायालयासमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी या साक्षीदाराने पुरोहित याला ओळखले, परंतु एटीएसकडे जबाब नोंदवल्याचे आपल्याला आठवत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर या साक्षीदाराला फितूर घोषित करण्याची विनंती प्रकरणाचा सध्या तपास करणाऱ्या एनआयएने विशेष न्यायालयाकडे केली. त्यानंतर या साक्षीदाराला फितूर जाहीर करण्यात आले.

हेही वाचा – आमदार हसन मुश्रीफांना ईडीचे समन्स; शुक्रवारी हजर राहण्यास सांगितले

हेही वाचा – अमृता फडणवीस खंडणी प्रकरण : अटक बेकायदा असल्याचा दावा करून अनिल जयसिंघानीची उच्च न्यायालयात धाव

पुरोहित आणि हा साक्षीदार एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून भेटले होते. त्यानंतर ते सतत संपर्कात होते, असे या साक्षीदाराने जबाब नोंदवताना सांगितले होते. शिवाय पुरोहित याने त्याला लष्करी अधिकाऱ्यांसाठी गोपनीय माहिती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपवली होती. तसेच त्याचे ओळखपत्रही दिले होते, असेही जबाबात सांगितल्याचा दावा तपास यंत्रणेचा आहे. पुरोहित याने हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रसार करण्याविषयी आणि त्या धर्तीवर संघटना उभी करण्याचे काम करत आहोत असेही आपल्याला सांगितले होते. पुण्यातील अभिनव भारत या संस्थेच्या बैठकीलाही आपण उपस्थिती लावली होती. या बैठकीत खटल्यातील अन्य आरोपीही सहभागी झाल्याचा दावा या साक्षीदाराने केल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 01:08 IST

संबंधित बातम्या