Maharashtra Relaxes COVID-19 lockdown : मॉल बंदच!

प्रशासनाचे २४ तासांत घूमजाव; मुंबई, ठाणे आणि पुण्यातील व्यावसायिकांमध्ये नाराजी

प्रशासनाचे २४ तासांत घूमजाव; मुंबई, ठाणे आणि पुण्यातील व्यावसायिकांमध्ये नाराजी

मुंबई : करोना निर्बंध शिथिल करताना राज्य सरकारने दुकानांची वेळमर्यादा वाढवून मॉलही खुले ठेवण्याचा मार्ग मोकळा केला असला तरी मुंबई आणि ठाण्यात मात्र मॉल बंदच राहणार आहेत. मुंबई पालिका आणि ठाणे जिल्हा प्रशासनाने मंगळवारी परिपत्रक काढून मॉलवरील निर्बंध कायम असल्याचे स्पष्ट केल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे.

करोना रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल करताना दुकानांची वेळमर्यादा वाढवून मॉल खुले ठेवण्यासही परवानगी दिली आहे. मात्र, मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यांचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविण्यात आला. त्यानुसार मुंबई पालिकेने सोमवारी परिपत्रक काढून आठवडय़ाचे सातही दिवस रात्री १० वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली. मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. या परिपत्रकात मॉलवरील निर्बंधांबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख नसल्याने मॉल सुरू करण्याची तयारी व्यवस्थापकांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने मंगळवारी पुन्हा परिपत्रक काढून मॉल बंदच राहणार असल्याचे स्पष्ट के ले. ठाणे जिल्हा प्रशासनानेही तोच कित्ता गिरवला. ठाण्यातील शहरी आणि ग्रामीण भागांतील दुकानांची वेळमर्यादा वाढवितानाच जिल्हा प्रशासनाने मॉलवरील बंदी कायम असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले.

ठाण्याचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी मंगळवारी ऑनलाइन बैठक घेतली. जिल्ह्य़ातील सर्वच पालिकांचे आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी त्यास उपस्थित होते. या बैठकीतील चर्चेनंतर जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेऊन त्यासंबंधीचा आदेश काढला. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आठवडय़ातील सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने सोमवार ते शनिवार रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. ही दुकाने रविवारी बंद राहणार आहेत. औषधालये सर्व दिवस पूर्ण वेळ सुरू राहतील. रेस्टॉरंट आणि उपाहारगृहे ५० टक्के क्षमेतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक उद्याने, खेळाची मैदाने ही केवळ व्यायाम, चालणे, धावणे आणि सायकलिंगसाठी पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. सर्व शासकीय, तसेच खासगी कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. ई-कॉमर्स सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू असणार आहे. सार्वजनिक परिवहन सेवा १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

आशा अन् निराशा..

निर्बंध शिथिलीकरणात मॉलही खुले ठेवण्याची परवानगी मिळेल, अशी आशा मॉल व्यवस्थापकांना होती. त्यामुळे त्यांनी मॉलमध्ये साफसफाईचे, निर्जंतुकीकरणाचे काम सुरू केले होते. मात्र, प्रशासनाच्या निर्णयामुळे त्यांची निराशा झाली.

विलंबाचा फटका

ठाणे जिल्ह्यासाठी निर्बंध शिथिलीकरणाची अंमलबजावणी ३ ऑगस्ट म्हणजेच मंगळवारपासून करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले. मात्ऱ, या परिपत्रकाची प्रत मंगळवारी सायंकाळी उशिराने प्रसृत करण्यात आली. तोपर्यंत शहरातील अनेक दुकाने पोलिसांनी दुपारी ४ वाजेनंतर बंद केली होती. परिपत्रक प्राप्त होताच व्यापाऱ्यांनी दुकाने पुन्हा सुरू केली.

पुण्यात घंटानाद

पुणे शहर आणि जिल्ह्य़ातील दुकानांवरील निर्बंध शिथिल करावेत, या मागणीसाठी पुण्यातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी घंटानाद आंदोलन केले. सरकारने दुकानांवरील निर्बंध मागे न घेतल्यास बुधवारपासून शहरातील सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा इशारा पुणे व्यापारी महासंघाने दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Malls in mumbai and thane will remain closed zws

ताज्या बातम्या