तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. ममता बॅनर्जींचा हा राजकीय चर्चांचा विषय देखील ठरत आहे. कारण, दिल्लीत नुकतीच पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर आता, या मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आहेत. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचे देखील त्यांचे नियोजन होते, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची भेट होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची बैठक होणार आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत माहिती देताना, “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात आज रात्री ८ वाजता मुंबईत बैठक होणार आहे. मी देखील या बैठकीतत सहभागी होणार आहे.” असे सांगितले आहे.

तसेच, “आरोग्याच्या समस्यांमुळे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची त्यांच्या दोन दिवसीय मुंबईत दौऱ्यात भेट घेणार नाहीत. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विविध मुद्द्य्यांवर बैठक करणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी या अगोदर सांगितलं होतं.” अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे.

“पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मुंबईत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देखील घ्यायची होती, मात्र आरोग्य समस्येमुळे भेट होत नाही. तथापि मी आणि आदित्य ठाकरे सायंकाळी साडेसात वाजता ट्रायटेंड येथे ममता बॅनर्जींना भेटणार आहोत.” असं संजय राऊत ट्विटद्वार म्हणाले आहेत.

ममता बॅनर्जी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेणार; नव्या समीकरणांवर चर्चा होणार? तर्क-वितर्कांना उधाण!

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकूण तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. आजपासूनच या दौऱ्याला सुरुवात झाली असून या तीन दिवसांमध्ये ममता बॅनर्जी इथल्या उद्योगपतींना भेटून त्यांना पुढील वर्षी एप्रिल महिन्यात होणाऱ्या बंगाल बिझनेस समिटचं निमंत्रण देणार आहेत.