scorecardresearch

समाजमाध्यमावर महिलेची बदनामी करणाऱ्यास अटक

समाजमाध्यमावर ३५ वर्षांच्या विवाहितेची बदनामी केल्याप्रकरणी सचिन नैनिलाल कनोजिया ऊर्फ भोला (२१) या आरोपीला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली.

arrest
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई: समाजमाध्यमावर ३५ वर्षांच्या विवाहितेची बदनामी केल्याप्रकरणी सचिन नैनिलाल कनोजिया ऊर्फ भोला (२१) या आरोपीला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. महिलेला धमकावून तिचे छायाचित्र समाजमाध्यमावर व्हायरल केल्याप्रकरणी कनोजियासह त्याच्या एका मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला वांद्रे येथे पती, दोन मुले आणि पुतणीसोबत राहते. याच परिसरात सचिन राहत असून काही महिन्यांपूर्वी या दोघांची ओळख झाली होती. या वेळी त्याने त्याच्या गावची ओळख काढून तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. तो तिला सतत दूरध्वनी, तसेच व्हिडीओ कॉल करीत होता. वारंवार दूरध्वनी करू नकोस असे सांगूनही तो त्रास देत होता. या महिलेचे अश्लील चित्रीकरण केल्याचे सांगून ते समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. कनोजिया तिच्याकडे अश्लील फोटो आणि व्हिडीओची मागणी करू लागला.
अलीकडेच तिचे अश्लील चित्रीकरण तक्रारदार महिलेचा मुलगा आणि पुतणीला मिळाले होते. हा प्रकार पुतणीकडून समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला. त्यांनी तात्काळ सचिनविरुद्ध निर्मलनगर पोलिसांत तक्रार केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी सचिनविरुद्ध विनयभंगासह बदनामी करणे आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. तपासादरम्यान सचिन त्याच्या उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील गावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच या पथकाने लखनऊ येथून सचिनला अटक केली. आरोपीच्या मित्राने चित्रीकरण समाजमाध्यमावर व्हायरल केल्याचे उघड झाल्यानंतर त्याविरोधातही गुन्ह दाखल करण्यात आला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man arrested defaming woman social media crime mumbai police amy