हार्बर मार्गावर टिळक नगर स्थानकाजवळ चालत्या गाडीतून पडून एक तरूण जखमी झाला. या तरुणाला सहप्रवाशांनी तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र हा तरुण गर्दीच्या लोंढय़ामुळे पडला की, स्टंटबाजी करताना पडला याबाबत रेल्वे पोलिसांनाच निश्चित माहिती मिळालेली नाही.
अबू पहल मोहम्मद इलियास असे या तरुणाचे नाव असून तो गोवंडीवरून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या लोकलमध्ये चढला. त्याच्यासह त्याचा मित्र मोहम्मद अन्सारी हादेखील होता. हे दोघेही दरवाज्यातच उभे होते. टिळक नगर स्थानकाजवळ अबूचा हात सटकल्याने तो खाली पडला. मोहम्मदसह इतर प्रवाशांनी टिळक नगर स्थानकात गाडी थांबवत अबूला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांना कळवण्यात आले. हा अपघात स्टंटबाजीमुळे झाला की, गर्दीच्या रेटय़ामुळे याबाबत आपल्यालाही माहिती नाही, असे वडाळा रेल्वे पोलीस स्थानकाचे अंमलदार संपत पोटघन यांनी
सांगितले.