Theft in Vitthal temple : आषाढी एकादशीच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष पंढरपुरच्या विठुरायाकडे लागते. वारकरी कित्येक दिवस आधीच पायी पंढरपुरच्या दिशेने निघालेले असतात. संपुर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या भक्तीमध्ये वारकरी तल्लीन झालेले असतात. मात्र मुंबईतील एका विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भक्ताने भलतेच कृत्य केले. सोशल मीडियावर सध्या विठ्ठल मंदिरातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक युवक पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर मूर्तीवरील चांदीचा मुकूट गुपचूप चोरून नेत असताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये काय दिसले? सोशल मीडियावर ३७ सेकंदाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या मंदिरात चोरी झाली, त्या मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक युवक विठ्ठल मंदिरात शिरून गाभाऱ्यात येताना दिसतो. गाभाऱ्यातील विठ्ठल - रखुमाईच्या मूर्तीकडे येताच. तो सर्वात आधी बॅगेची चैन उघडतो. मग विठ्ठलाचे हात जोडून दर्शन घेतो. काही सेकंद इकडे-तिकडे पाहिल्यानंतर तो हळूच विठ्ठलाच्या मूर्तीवरील चांदीचा मुकूट घेऊन आपल्या बॅगेत टाकतो आणि तिथून चालू पडतो. टाइम्स नाऊने दिलेल्या बातमीनुसार सदर मंदिर मुंबईतील बोरीवली विभागात असल्याचे सांगितले आहे. सीसीटीव्ही फुटेजवर १० जुलै २०२४ मधील हा व्हिडीओ असल्याचे दिसत आहे. नुकतीच १७ जुलै रोजी आषाढी एकदशीचा उत्सव पार पडला. त्याच्या एक आठवडा आधी ही चोरी झाल्याचे दिसत आहे. मुंबईत नुकतीच चोरीची आणखी एक विचित्र घटना घडली आहे. कामगार वर्गाचा संघर्ष आपल्या लेखणीतून मांडणारे थोर साहित्यिक आणि कवी नारायण सुर्वे यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली. मात्र चोराला संबंधित चोरी कवी नारायण सुर्वे यांच्या घरी केल्याचे समजल्यानंतर त्याने सर्व वस्तू परत केल्या. तसेच त्याबरोबर एक चिठ्ठी लिहून सुर्वे कुटुंबियांची माफीही मागितली. हे ही वाचा >> नारायण सुर्वे यांच्या घरी चोराने मारला डल्ला, नंतर चिठ्ठी लिहून परत केली वस्तू; म्हणाला, “मला माहीत नव्हतं..” नेमकं काय घडलं? रविवारी (दि. १४ जुलै) दिवंगत कवी नारायण सुर्वे यांची मुलगी सुजाता घारे आणि त्यांचे पती गणेश घारे हे नेरळ येथून विरारला गेले होते. नारायण सुर्वे ज्या घरात राहायचे त्या घरात आता त्यांची मुलगी आणि जावई राहतात. घारे दाम्पत्याचा मुलगा विरारला असतो. त्यामुळे ते तिकडे गेले होते. १४ जुलैच्या दिवशी त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांचा फोन आला. त्यांना हे सांगण्यात आले की तुमच्या घराच्या बाथरुमच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत. बहुदा चोरी झाली असावी. यानंतर या दोघांनी घरी येऊन पाहिले तर घरात सामान अस्ताव्यस्त पडले होते. याबाबत सुजाता घारे म्हणाल्या, “आमच्या घरात बाबांचा (नारायण सुर्वे) मोठा फोटो लावला आहे. आम्हाला त्या फोटोजवळ एक चिठ्ठी सापडली. त्यात लिहिले होते की, मला माहीत नव्हतं की हे नारायण सुर्वेंचं घर आहे. जर माहीत असतं तर मी या घरात कधीच चोरी केली नसती. मी तुमच्या घरातून चोरलेल्या वस्तू परत करत आहे. मला माफ करा.” अशी माहिती सुजाता घारे यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.