scorecardresearch

वाहनतळ व्यवस्थापनाला अखेर मुहूर्त;मलबार हिल, नेपियन्सी रोड, पेडर रोड, भुलाबाई देसाई मार्गावर लवकरच वाहनतळ उपलब्ध

पालिकेने मोठा गाजावाजा करून घोषणा केलेले वाहनतळ प्राधिकरण अद्याप स्थापन झालेले नाही. तीन विभागात करण्यात येणारे वाहनतळ व्यवस्थापन गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे.

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : पालिकेने मोठा गाजावाजा करून घोषणा केलेले वाहनतळ प्राधिकरण अद्याप स्थापन झालेले नाही. तीन विभागात करण्यात येणारे वाहनतळ व्यवस्थापन गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. मात्र, आता पालिकेच्या डी विभाग कार्यालयानेच मलबार हिल, नेपियन्सी रोड, भुलाबाई देसाई रोड या महत्त्वाच्या ठिकाणच्या रस्त्यावर सशुल्क वाहनतळ सुरू करण्याची तयारी केली आहे.

मुंबईमध्ये वाहनांची संख्या बेसुमार वाढल्यामुळे आणि वाहनतळांची पुरेशी सुविधा नसल्यामुळे रस्त्यावर कुठेही कशाही पद्धतीने वाहने उभी केली जातात. रहिवासी आणि उपनगरातून किंवा मुंबईबाहेरून येणाऱ्याच्या वाहनांसाठी जागा अपुरी पडते. वाहनतळाचा प्रश्न सोडवण्यासाठी व वाहने उभी करण्याच्या पद्धतीला शिस्त लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा २०१६ मध्ये केली होती. वाहनतळ प्राधिकरणाच्या निर्मितीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. या नियोजित वाहनतळ प्राधिकरणाद्वारे प्रायोगिक स्वरूपात ग्रॅन्ट रोड, अंधेरी पश्चिम आणि भांडूप या परिसराचा समावेश असलेल्या अनुक्रमे ‘डी’, ‘के पश्चिम’ व  ‘एस’ विभागात प्रायोगिक तत्वावर वाहनतळ व्यवस्थापन आराखडय़ाची अंमलबजावणी करण्याची घोषणा जुलै महिन्यात केली होती. अद्याप या तीन विभागात प्राधिकरणाने त्याची अंमलबजावणी केलेला नाही. आता डी विभाग कार्यालयाने याबाबत अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.

वाहनतळांची संख्या कमी पडू लागल्यामुळे रस्त्यावर सशुल्क वाहनतळ सुरू करणे, त्याचे व्यवस्थापन करणे, त्याचे दर ठरवणे ही कामे याअंतर्गत केली जाणार आहे. सध्या तरी डी विभागातील मलबार हिल, भुलाबाई देसाई रोड, नेपियन्सी रोड, कारमायकल रोड, पेडर रोड अशा उच्चभ्रू विभागातील रस्त्यावर सशुल्क वाहनतळे उपलब्ध  केली जाणार आहेत. त्यानुसार या विभागातील कोणत्या रस्त्यावर वाहनतळ करता येईल, कोणते रस्ते मोकळे ठेवावे याबाबतचा आराखडा डी विभागाने तयार केला असून त्याकरिता वाहतूक विभागाची परवानगीही घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.

पुढचा टप्पा म्हणून सध्या या विभागातील रहिवासी संघटनांशी चर्चा करून त्यांना या सशुल्क वाहनतळ योजनेबाबत माहिती दिली जात आहे. सध्या या रस्त्यावर दुतर्फा कशाही गाडय़ा उभ्या असतात. दुर्घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाडय़ांनाही जाण्यासाठी मार्ग मिळत नाही. त्यामुळे रस्त्याच्या एकाच बाजूला सशुल्क वाहनतळाची सोय केल्यास ज्यांना पैसे भरून जागा आरक्षित करण्याची इच्छा आहे, त्यांना तो पर्याय उपलब्ध होईल. तसेच कुठेही कशाही पद्धतीने गाडय़ा लावण्यास अटकाव होईल आणि वाहतूक कोंडीही होणार नाही, अशी ही योजना आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर ती डी विभागातीलच ताडदेव, खेतवाडी, नाना चौक, मुंबई सेंट्रल अशा गजबजलेल्या परिसरातही राबविण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. निवासी आणि व्यावसायिक अशा दोन प्रकारच्या वाहनांसाठी हे सशुल्क वाहनतळ रस्त्यावर तयार केले जाणार आहे. यापूर्वी पालिकेने आखलेल्या वाहनतळ धोरणानुसारच दर ठरवण्याचा विचार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

जागा कमी, गाडय़ा जास्त

या प्रयोगासाठी डी विभागाने निवडलेल्या रस्त्यावर सध्या किती गाडय़ा उभ्या असतात, किती गाडय़ांसाठी वाहनतळाची सोय होऊ शकते याबाबत सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार सहा हजार गाडय़ांसाठी वाहनतळाची सुविधा देता येणे शक्य असून प्रत्यक्षात मागणी नऊ हजार गाडय़ांची आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे यामध्ये सोसायटय़ांची मदत घेऊन नियोजन केले जाणार आहे व जागा आखून दिली जाणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Management soon parking malabar hill napiansi road pedder road bhulabai desai marg amy

ताज्या बातम्या