मुंबई : पश्चिम हिमालयातील काही भागांमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरु असून त्याचा थेट परिमाण हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांवर झाला आहे. यामुळे प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर जाणाऱ्या मार्गांवर अडथळे निर्माण झाल्याने याचा परिणाम आता पर्यटनावर होताना दिसत आहे. मनाली येथील अटल बोगद्याजवळ एक हजाराहून अधिक वाहने अडकली असून प्रशासनाकडून मार्गातील अडथळे दूर करण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यात राज्यातील काही पर्यटकही आहेत.
पश्चिम हिमालयात साधारणपणे डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान बर्फवृष्टी होते. मार्चमध्ये बर्फवृष्टी झाल्याने त्याचा परिणाम पर्यटनावरही झाला आहे. रविवारी मनाली येथे जोरदार बर्फवृष्टी झाली. यामुळे अटल बोगद्याच्या परिसरात एक हजाराहून अधिक वाहने अडकली आहेत. बोगद्याच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ वेगाने बर्फ जमा होऊ लागल्याने तेथील रस्ते निसरडे झाले असून त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. प्रशासनाकडून रस्त्यावर अडकून पडलेल्या वाहनांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे प्रयत्न केले जात आहे. शनिवारी मनाली येथे सामान्य हवामान असल्याने पर्यटक लाहौल व्हॅली आणि अटल टनल आदी उंचावर असलेल्या पर्यटनस्थळांकडे गेले होते. मात्र, हवामानात बदल झाल्याने तेथे बर्फवृष्टी होऊ लागली.
मार्चमध्ये बर्फवृष्टी का झाली ?
भारतीय हवामान विभागाच्या मते, पश्चिमी विक्षोभमुळे (वेस्टर्न डिस्टर्बन्स) पश्चिम हिमालयातील काही भागात बर्फवृष्टी होत आहे. पश्चिम हिमालयात साधारणपणे डिसेंबर ते फेब्रुवारी या काळातच सर्वाधिक बर्फ पडतो. अनेकदा वेस्टर्न डिस्टर्बन्स हिवाळा संपताना किंवा वसंत ऋतूच्या सुरुवातीपर्यत सक्रिय राहू शकतो. यामुळे मार्चमध्येही बर्फवृष्टी होण्याची शक्यता असते. हवामान अभ्यासकांच्या मते, मार्चच्या सुरुवातील विविध डोंगराळ प्रदेशात अपेक्षेहून अधिक उष्ण आणि कोरडे हवामान होते. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे तापमानात अचानकपणे घट झाली आणि त्याचा परिणाम म्हणून बर्फवृष्टीला सुरुवात झाली.
वेस्टर्न डिस्टर्बन्स ही कमी दाबाची प्रणाली अटलांटिक महासागर आणि युरोप जवळ मध्य-अक्षांश प्रदेशात उद्भवते. भूमध्य समुद्रावर सामान्यतः कमी दाब तयार होतो आणि तो भूमध्य सागरातून ओलावा घेऊन भारतात प्रवेश करतो. हे आर्द्रतेने भरलेले वेस्टर्न डिस्टर्बन्स अखेरीस हिमालयाच्या पलीकडे येतात आणि अवरोधित होतात. परिणामी, वायव्य भारत व काहीवेळा उत्तर भारताच्या इतर भागांमध्ये हिमवर्षाव आणि पावसाच्या रूपात पर्जन्यवृष्टी होते.
पर्यटकांनी खबदारदारी घेण्याचा प्रशासनाचा सल्ला
पर्यटकांनी हिमाचल प्रदेशातील उंचावर असणाऱ्या पर्यटनस्थळांकडे जाण्याआधी हवामानाचा अंदाज घ्यावा कारण हिमालयात अचानक बर्फवृष्टी सुरु झाल्यास रस्ते बंद होणे, वाहतूक कोंडी तसेच वाहनचालकांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी काळजी घेण्याचा सल्ला तेथील प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
