मुंबई : चेंबूर मेट्रो स्थानकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुढील आठवड्यात लोकार्पण होत आहे. त्यामुळे मुंबईकरांना मंडाले-चेंबूरदरम्यान मेट्रो प्रवास करता येईल. चेंबूर मेट्रो स्थानकाबरोबरच ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील दुसरे, अर्जुना टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) भूगर्भात सोडले जाईल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाकोला ते वांद्रे-कुर्ला संकुल उन्नत मार्गाचेही लोकार्पण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘अंधेरी पश्चिम-मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब’ मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाले. सुमारे २३.६४ किमीच्या ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेचे काम तीन टप्प्यांत सुरू असून यातील पहिला मंडाले-डायमंड गार्डन दरम्यानचा ५.६ किमी लांबीचा टप्पा एप्रिलमध्ये सेवेत दाखल झाला. हा टप्पा कमी अंतराचा असून चेंबूरपर्यंत प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असताना हा टप्पा डायमंड गार्डनपर्यंत आहे. त्यामुळे या टप्प्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळेल की नाही अशी साशंकता एमएमआरडीएला होती. त्यामुळे टप्पा सेवेत दाखल करण्यापूर्वीच डायमंड गार्डन-सारस्वत नगर टप्पा २ मधील चेंबूर स्थानक लवकरात लवकर पूर्ण करून ते सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मेमध्ये हे स्थानक सेवेत दाखल करण्याचे नियोजन होते. त्यानुसार मेअखेरीस या स्थानकासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) पथकाकडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यात आले.
चेंबूर मेट्रो स्थानकाच्या लोकार्पणासह सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पातील वाकोला-बीकेसी उन्नत मार्गाचेही लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुढील आठवड्यात एकाच दिवशी होईल. या पुलाचेही काम पूर्ण होऊन बरेच दिवस झाले असून केवळ लोकार्पणामुळे हा मार्गही सेवेत दाखल होऊ शकला नव्हता. हा मार्ग सेवेत दाखल झाल्यास वाकोला-बीकेसी प्रवास अवघ्या काही मिनिटांत करता येईल. या दोन प्रकल्पांच्या लोकार्पणाबरोबरच त्याच दिवशी आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील एका महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. ठाणे – बोरिवली प्रवास अतिजलद करण्यासाठी एमएमआरडीएकडून ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ११.८ किमीच्या या प्रकल्पातील भुयारीकरणासाठी ठाणे येथे लॉन्चिंग शाफ्ट तयार करण्यात आले आहे. तर बोरिवलीतील लॉन्चिंग शाफ्टचे काम सुरू आहे. या दोन्ही लॉन्चिंग शाफ्टमध्ये प्रत्येकी दोन टीबीएम सोडून भुयारीकरणाचे काम केले जाईल.
त्यानुसार ठाण्यातील लॉन्चिंग शाफ्ट काही दिवसांपूर्वीच नायक टीबीएम सोडून भुयारीकरणास सुरुवात करण्यात आली. तर आता याच लॉन्चिंग शाफ्टमध्ये अर्जुना नावाचे दुसरे टीबीएम पुढील आठवड्यात भूगर्भात सोडले जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
मोनोरेलची प्रतीक्षा
चेंबूर-संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्गिका सप्टेंबर २०२५ पासून बंद आहे. सतत अपघात व प्रवासी संख्या नसल्याने होणारा तोटा यामुळे या मार्गिकेचे अत्याधुनिकीकरण करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. या कामासाठी मोनोरेल मार्गिका अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली. सेवा बंद कालावधीत अत्याधुनिकीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात मोनोरेल संचालनासाठीही सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे मोनोरेलही जूनमध्ये सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र यासाठीही एमएमआरडीएला मुहूर्त मिळालेला नाही.
