मुंबई : अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेच्या तिसऱ्या टप्प्यातील एकमेव चेंबूर मेट्रो स्थानकाच्या संचालनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या स्थानकाचे गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तर दुसरीकडे वाकोला – वांद्रे-कुर्ला संकुल उन्नत मार्गाचेही लोकार्पण यावेळी होणार आहे. लोकार्पणानंतर सायंकाळी ५ वाजता चेंबूर मेट्रो स्थानक सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून मंडाले – चेंबूर असा थेट मेट्रो प्रवास करता येणार आहे. वाकोला – बीकेसी उन्नत मार्ग लोकार्पणानंतर तात्काळ दुपारी २ पर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाणार असून वाकोला – बीकेसी प्रवास गुरुवारी दुपारपासून ५ ते १० मिनिटांत करता येणार आहे.

मेट्रो २ ब मार्गिकेवरील प्रवाशांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी, तसेच मोनोरेलला मेट्रो २ ब शी जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो २ ब मार्गिकेच्या तिसऱ्या टप्प्यातील एकमेव चेंबूर मेट्रो स्थानक सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मूळ वेळापत्रकानुसार हे स्थानक २०२७ अखेरीस सेवेत दाखल होणार होते. पण आता मात्र हे एकमेव स्थानक सेवेत दाखल होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. तर दुसरीकडे सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पातील तिसरा आणि शेवटचा वाकोला – बीकेसी उन्नत मार्गही आता सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.

वाकोला – बीकेसी उन्नत मार्ग आणि चेंबूर मेट्रो स्थानकाचे लोकार्पण गुरुवारी दुपारी १ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूर दृश्य प्रणालीद्वारे केले जाणार आहे. लोकार्पण झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता मेट्रो स्थानक, तर दुपारी २ पर्यंत उन्नत मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील ठाणे लॉन्चिंग शाफ्टमध्ये दुसरे ‘अर्जुना’ नावाचे टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) सोडण्यात येणार आहे. हा कार्यक्रमही दूर दृश्य प्रणालीद्वारे होणार आहे.