मुंबईत दाटीवाटीने उभ्या ठाकलेल्या इमारतींमध्ये आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवण्यात येणाऱ्या अडचणींमुळे जिवघेण्या दुर्घटना घडत असताना इमारतीच्या किमान एका बाजूला सहा मीटरची जागा सोडावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. तसेच सरसकट एफएसआय वाढवू नका, तर त्या परिसरातील पायाभूत सुविधांची क्षमता लक्षात घेऊन त्याबद्दल निर्णय व्हावा असेही न्यायालयाने ठणकावले आहे.
सध्या छोटय़ा भूखंडांवरील इमारतींच्या बांधणीत दीड मीटर जागा सोडण्याची तरतूद होती. पण ‘केम्प्स कॉर्नर’ येथील इमारतीसह अन्य काही प्रकरणांत इमारतीच्या भोवती पुरेशी जागा नसल्याने आगीचे बंब जाऊ न शकल्याने दीड मीटर जागा सोडण्याची सवलत रद्द करून आगीचा बंब जाऊ शकेल इतपत किमान सहा मीटर इतकी हवी असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच गगनचुंबी टॉवर बांधताना मनोरंजन मैदानाची जागा  जमिनीवरच हवी, असेही न्यायालयाने या निकालात म्हटले आहे.