ज्या मांडवी कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी कष्टकरी जनतेने बहाल केली त्या कोळीवाड्याचे अस्तित्त्वच फक्त निवासी पत्त्यापुरते मर्यादीत राहिले आहे. कोळीवाडा आहे, परंतु बंदर गिळंकृत झाल्याने मासेमारी पार पूर्वीच बंद झाली आहे. रस्त्यांना वा चौकाला कोळी समाजातील मान्यवरांची नावे देण्यापुरतेच या कोळीवाड्याचे अस्तित्त्व राहिले आहे. आज संपूर्ण परिसर दुकानांनी व त्यावर चढविलेल्या छोटेखानी जुन्या इमारतींमध्ये मांडवी कोळीवाडा नष्ट झाला आहे.
एक काळ असा होता की, मांडवी बंदर हे कोळी समाजासाठी बोटीचे साहित्य पुरविणारे महत्त्वाचे बंदर होते. दक्षिण भारतातून येणारा चंद्रुस हा विशिष्ट झाडांचा चिक, दोरखंड, तेल पुरवठा व्हायचा. चंद्रुसचा वापर बोटीचे लाकूड लेपन करण्यासाठी वा दोन फळ्यांमधील फट दूर करण्यासाठी होत होता. त्याकाळी रंग सहज उपलब्ध नव्हता. अशा वेळी चंद्रूस या झाडांचा चीक महत्त्वाची भूमिका बजावत होता. आता त्याची जागा डांबराने घेतली आहे. नायलॉन सहजगत्या उपलब्ध नव्हते तेव्हा विशिष्ट दोरखंड उपयोगी पडत होता. अख्या राज्यातून कोळी बांधव खरेदीसाठी मांडवी बंदरावर येत होते. रत्नागिरी, राजापूर येथून चाकरमानी बोटीने याच ठिकाणी उतरत होते. परंतु प्रिन्सेस गोदीमुळे किनाऱ्यात भराव टाकण्यात आला आणि मांडवी कोळीवाडा तेव्हाच संपुष्टात आला.
मध्य व हार्बर रेल्वेच्या मस्जिद या रेल्वे स्थानकातून पश्चिमेला बाहेर पडल्यानंतर खेटून असलेल्या सिमेंट चाळ नंबर एक आणि दोन यामध्ये दोनशे ते अडीच चौरस फुटांच्या काही खोल्यांतून आजही कोळी बांधव आढळतील. बहुसंख्य घरे विकण्यात आली आहेत. या चाळींमधीलही शिल्लक राहिलेले कोळी बांधव मासेमारी करण्यासाठी अन्य बोटीवर जातात वा महिला क्रॅाफ्रर्ड मार्केट, फोर्ट मार्केट, भायखळा आदी ठिकाणी मासेविक्री करण्यासाठी जातात. मांडवी कोळीवाड्यातील मूळ कोळी समाज विखुरला गेला आहे. मरीन लाईन्स रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या चीरा बाजारात आजही कोळी बांधव आढळतात. बहुसंख्य कोळी समाज ठाण्यातील चेंदणी, महागिरी परिसरात स्थायिक झाला, असे मांडवी कोळीवाड्यातील ज्येष्ठ नागरिक शशिकांत नाखवा राहतात. नाखवा यांचा जन्म मांडवी कोळीवाड्यातलाच. ते सुरुवातीला काही काळ चीरा बाजारात, नंतर सांताक्रूझ कोळीवाड्यात (तोही आता नावापुरता राहिला आहे) आणि आता जोगेश्वरीत स्थलांतरित झाले आहेत. आता त्यांनाही कोळीवाड्यांसाठी काही होईल असे वाटत नाही. उंच इमारतींच्या गर्दीत एकेकाळी कोळीवाडे होते, असा उल्लेख होईल का, याबाबतही ते साशंक आहेत.
ब्रिटिशांनी जेव्हा व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच व्ही. टी. रेल्वे स्थानक (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) बांधायचे ठरविले तेव्हा मांडवी कोळीवाडा हलविण्यात आला. तत्कालीन ब्रिटिश सरकारने तेथे अस्तित्त्वात असलेली कोळी समाजाची मासळी सुकविण्याची जागा सुरुवातीला ताब्यात घेतली. प्रिन्सेस डॅाकसाठी मांडवी कोळीवाड्याच्या तर माझगाव डॅाकसाठी माझगाव कोळीवाड्याच्या जागेवर कब्जा करण्यात आला. अखेरीस काही कोळी बांधवांची ठाण्यात (आताचा चेंदणी कोळीवाडा) तर काही इतरत्र विखुरले गेले. महात्मा जोतिबा फुले यांनी कोळी समाजासाठी आंदोलन केले. अखेरीस गोदीचे काम सुरु असल्यामुळे कामगारांसाठी बांधलेल्या सिमेंट चाळीत यापैकी काही कोळी बांधवांची व्यवस्था करण्यात आली. सिमेंट चाळ क्रमांक एक व दोन म्हणजेच मांडवी कोळीवाडा, असे ठामपणे सांगितले जाते. कोळी बांधवांनीच जोतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली, असा दावा महाराष्ट्र कोळी महासंघाचे नेते राजहंस टपके करतात. जोतिबांना ‘महात्मा’ ही पदवी ११ मे १८८८ रोजी समाजसुधारक विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी बहाल केली व हा कार्यक्रम मांडवी कोळीवाड्यात झाला तेव्हा कोळी समाज प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होता, असे कुलाबा कोळीवाड्यातील गोरक्षनाथ कोळीही तेच सांगतात.
नव्याने बांधलेला कर्नाक पूल ते मस्जिद रेल्वे स्थानकांच्या पश्चिम स्थानकाबाहेर उतरल्यावर अगदी रेल्वे रुळांना खेटून असलेल्या या दोन सिमेंट चाळी दिसतात. एकेकाळी मांडवी कोळीवाड्याचा परिसर तीन लाख ५३ हजार २१९ चौरस मीटर इतका होता. परंतु प्रिन्सेस डॉकसाठी यापैकी बहुसंख्य भाग गिळंकृत करण्यात आला. आज दोन सिमेंट चाळी सोडल्या तर सर्वत्र मांडवी कोळीवाडा असा उल्लेख असलेल्या वेगवेगळ्या इमारती दिसतात. परंतु या इमारतींतून कोळी समाज कुठेच दिसत नाही.
माझगाव गोदीची उभारणी झाल्यानंतर
एकेकाळी हे दोन्ही कोळीवाडे समुद्रकिनारी होते. नौकेसाठी लागणारे सर्व साहित्य मांडवी बंदरावर मिळत असत. आज काथा बाजार दिसतो. परंतु मासेमारीसाठी आवश्यक साहित्यांची विक्री करणाऱ्या बोहरा समाजाची दुकाने फारच क्वचित दिसतात. आज सर्व गल्ल्यात गुजराती-मारवाडी समाजाची दुकाने दिसतात. या सर्वांच्या पत्त्यावर उल्लेख असतो मांडवी कोळीवाडा. येथे एकेकाळी कोळीवाडा होता. परंतु आता ही दुकाने आमच्या मालकीची आहेत, असे तेथील व्यापारी सांगतात. या ठिकाणी एका उंच टॉवरचे काम सुरु आहे. कोळीवाड्याबाबत कुठलेही अधिकृत धोरण नसताना विकास नियंत्रण नियमावलीतील ३३(७) या जुन्या इमारतींसाठी असलेल्या प्रक्रियेचा बिनधास्त वापर केला जात आहे. त्यामुळे भविष्यात या कोळीवाड्याचे उरलेसुरले अस्तित्त्वही उत्तुंग इमारतींच्या गर्दीत हरवून जाईल, हे मात्र निश्चित.
माझगाव कोळीवाड्याची तीच गत!
माझगाव गोदीची उभारणी झाल्यावर तेथे असलेल्या कोळीवाड्याची तीच गत झाली. ३० ते ३५ घरे आजही माझगाव परिसरात कोळी समाजाची म्हणून सांगितली जातात. परंतु या समाजाच्या मासळी सुकविण्यासाठी मोठ- मोठ्या जागा (भूखंड) तेव्हा त्यांच्याकडे होत्या. परंतु या सर्व जागा गोदीसाठी ताब्यात घेण्यात आल्या. या जागांची कागदपत्रे नसल्यामुळे या कोळी बांधवांना हक्क सोडण्यावाचून काहीही पर्याय राहिला नाही. कोळीवाड्यांचे राज्य शासनाकडून अधिकृत सीमांकन सुरु आहे. परंतु मांडवी वा माझगाव कोळीवाड्यांना सीमांकनात हक्काने सांगावा असा भूखंडच उरलेला नाही, अशी खंतही नाखवा व्यक्त करतात.
nishant.sarvankar@expressindia.com
