मुंबई – मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या लेटरहेडचा गैरवापर झाला असून मुंबई आणि उपनगरातील प्रकल्पग्रस्तांठीच्या सदनिकांच्या वाटपात १०० कोटी रुपयांहून अधिकचा घोटाळा झाला असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याविषयी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून या घोटाळयाची चौकशी करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुंबईत प्रकल्पग्रस्तांना घरे मिळवून देण्याच्या नावाखाली एक मोठी टोळी सक्रिय आहे. यामध्ये ‘सकल हिंदू समाज’ ही संस्था दलालाची भूमिका बजावत असून, वीरेंद्र प्रताप उर्फ बबलू सिंह नावाचा व्यक्ती या उद्योगाचा सूत्रधार असल्याचे संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. ही संस्था बोगस सदनिकाधारकांची नावे आपल्या लेटरहेडवर देऊन त्याला मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे शिफारसपत्र जोडते. त्याद्वारे म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.

या घोटाळ्याची कार्यपद्धती स्पष्ट करताना संजय राऊत यांनी गोवंडी पूर्व येथील हनुमान मंदिराजवळील ‘समर्पण सोसायटी’चे उदाहरण दिले आहे. त्यांच्या दाव्यानुसार, बबलू सिंह याने अस्तित्वात नसलेल्या ‘अजित धनाजी कदम’ या नावाने तक्रार अर्ज केला आणि या सोसायटीतील सदनिका क्र. १०२, १०३ आणि १०४ चे वाटप सुरेश नारायण गुप्ता, अनिल गुप्ता आणि शिला लालमन गुप्ता यांना करून दिले. या बदल्यात प्रत्येकी १० ते १५ लाख रुपये उकळले असून, हा संपूर्ण व्यवहार बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आल्याचे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. अशाप्रकारे मुंबई आणि उपनगरात शेकडो सदनिकांचा गैरव्यवहार झाला असून बनावट ओळखपत्रे, बनावट सही-शिक्के आणि बनावट कागदपत्रे तयार करून मूळ प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

विशेष म्हणजे यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या लेटरहेडचा वापर करून सुरू असलेला हा सदनिका घोटाळा अत्यंत गंभीर असून, गरीब मराठी माणसांची फसवणूक केली जात आहे. मुख्यमंत्री महोदयांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन या ‘रॅकेट’चा पर्दाफाश करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.