मुंबई : लोअर परळ येथील रेल्वे पुलाखालील मोकळ्या जागेचा वापर स्थानिक रहिवाशांच्या सोयीसाठी व्हावा, अशी आग्रही भूमिका शिवसेनेने (ठाकरे) घेतली आहे. मात्र, ही जागा एका खासगी संस्थेला मिळावी, यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप शिवसनेकडून (ठाकरे) करण्यात आला.

लोढा यांचा निषेध करण्यासाठी शनिवारी सकाळी करीरोड नाका येथे शिवसेनेच्या (ठाकरे) गटनेत्या व विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले. त्यावेळी ‘लोढा हटाव, मुंबई बचाव’च्या घोषणा देण्यात आल्या.

लोअर परळ येथील रेल्वे पुलाखालील मोकळ्या जागेमध्ये ज्येष्ठ नागरिकांकरीता विरंगुळा केंद्र, लहान मुलांकरीता उद्यान, तसेच तरूणांकरीता खुली व्यायामशाळा आदी सुविधा निर्माण कराव्या, अशी मागणी शिवसेनेकडून (ठाकरे) करण्यात आली आहे. या जागेचा दुरूपयोग टाळावा यासाठी आमदार अजय चौधरी आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याबाबत बैठकही आयोजित करण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभाग कार्यालयाने यासंदर्भातील आराखडे मंजुरीसाठी महापालिका प्रशासनाकडे सादरही केले होते.

तसेच, चौधरी यांनी जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्र्यांकडून या सुविधांसाठी ३ कोटी रूपये निधी नगरविकास खात्याकडून वर्ग करून घेतला होता. असे असूनही लोढा लोअर परळ येथील रेल्वे पुलाखालील जागा शिवकल्याण केंद्र या संस्थेला मिळावी, यासाठी पत्रव्यवहार व बैठका घेत आहेत. यासाठी ते महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप शिवसेनेने (ठाकरे) केला. ही बाब समजताच शिवसेनेने (ठाकरे) आक्रमक भूमिका घेतली.

लोढा यांनी स्थानिकांना विश्वासात न घेता यासंदर्भात सुरू केलेल्या हालचालींचा निषेध करण्यासाठी शनिवारी सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान शिवसेनेने (ठाकरे) लाक्षणिक उपोषण केले. उपोषणादरम्यान लोढा यांच्याविरोधात घोषणबाजी करण्यात आली. या आंदोलनात स्थानिक रहिवासी, शिवसेनेचे (ठाकरे) पदाधिकारी, कार्यकर्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हा संपूर्ण रहिवाशी पट्टा असून येथे कष्टकरी, गिरणीकामगार तसेच ग्रामस्थ व म्हाडा इमारतीतील रहिवाशी आहेत. या रहिवाशांचा या मोकळ्या जागेवर नैतिक अधिकार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्थानिकांना देण्यात येणाऱ्या या सुविधांवर कोणीही खासगी संस्थांच्या माध्यमातून डल्ला मारण्याचा प्रयत्न केला तर स्थानिक रहिवासी सहन करणार नाहीत, असा इशारा शिवसेनेकडून (ठाकरे) देण्यात आला.