scorecardresearch

महाबळेश्वरमधील मांघर देशातील पहिले मधाचे गाव; राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने उपक्रम

महाबळेश्वर परिसर हा स्ट्रॉबेरीसाठी देशभर ओळखला जातो आणि याच परिसरातील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध झाले.

मुंबई  : महाबळेश्वर परिसर हा स्ट्रॉबेरीसाठी देशभर ओळखला जातो आणि याच परिसरातील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध झाले. आता याच महाबळेश्वर परिसरातील मांघर हे गाव देशात मधाचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. राज्य  खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधाचे गाव हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी महाबळेश्वरनजीक असलेल्या मांघर गावाची निवड करण्यात आली आहे. मांघर हे महाबळेश्वरपासून ८ किलोमीटर अंतरावर डोंगर कडय़ाखाली वसलेले गाव आहे. गावाच्या भोवताली घनदाट जंगल असून या ठिकाणी वर्षभर फुलोरा असतो. गावात सामूहिक मधमाशांचे संगोपन केले जाते. मधमाशांच्या परपरागीकरणामुळे पिकांची उत्पादकता वाढते. गावातील ८० टक्के लोक मधमाशी पालनाचा व्यवसाय करतात.

मधाचे गाव या उपक्रमांतर्गत या गावात मधमाशांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या निमित्ताने महाबळेश्वराला येणाऱ्या पर्यटकांना व ग्राहकांना शुद्ध व दर्जेदार मध मिळणार आहे. मधाचे गाव हे निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करण्याबरोबरच डोंगराळ व जंगली भागात राहणाऱ्या लोकांसाठी कायम स्वरूपी रोजगार निर्माण करणारा प्रकल्प ठरणार आहे. निसर्गातील अन्न साखळीतील महत्वाचा घटक म्हणून मधमाशांकडे पाहीले जाते. मधमाशांच्यामुळे पीक उत्पादनात देखील भरघोस वाढ होत आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्हात देखील हा प्रकल्प राबविला जाणार आहे. मधमाशा संवर्धनासोबत निसर्ग संवर्धनासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manghar mahabaleshwar first honey village country activities behalf state industries board ysh

ताज्या बातम्या