बंदर उभारणीसाठी खारफुटींची कत्तल; उरण-करंजा किनाऱ्यावर खासगी कंपनीचे कृत्य

स्थानिक मच्छीमार व सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी याबाबतचे पुरावे सादर करूनही पोलिसांनी कंपनीऐवजी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणातील सरकारी यंत्रणेच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे.

उरण : उरणनजीकच्या करंजा खोपटा खाडीनजीक उभारण्यात येत असलेल्या खासगी बंदराकरिता संबंधित कंपनीने किनाऱ्यावरील खारफुटीची शंभरहून अधिक झाडांची कत्तल केल्याचे निदर्शनास आले आहे. या कृत्याचा सुगावा लागू नये म्हणून कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एका बोटीतून ही तोडलेली खारफुटी खोल समुद्रात फेकली.

स्थानिक मच्छीमार व सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी याबाबतचे पुरावे सादर करूनही पोलिसांनी कंपनीऐवजी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणातील सरकारी यंत्रणेच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे.

उरण समुद्र किनाऱ्यावर करंजा टर्मिनल अ‍ॅण्ड लॉजिस्टिक प्रा. लि. या कंपनीमार्फत खासगी बंद विकसित करण्यात येत आहे. यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणात खारफुटीची तोड केल्याच्या तक्रारी स्थानिक मच्छीमारांनी केल्या होत्या. त्यानंतर उरण सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली असता कंपनीच्या पूर्वेकडील धक्क्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात खारफुटी तोडल्याचे आढळले. तोडलेल्या खारफुटीचे सात ढिगारे समुद्रात फेकण्यात आल्याचे आणि धक्क्यालगत खारफुटीचे तोडलेले शंभर बुंधे आढळले. खारफुटीची तोडलेली झाडे दोरखंडाला बांधून बोटीच्या साह्याने समुद्रात खोलवर नेऊन फेकण्यात येत असताना स्थानिक मच्छीमारांनी त्याचे छायाचित्रण आणि चित्रीकरण करून हे सर्व पुरावे रायगड जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस तसेच वनविभागाकडे पाठवले. मात्र, उरणच्या तहसीलदारांनी पोलिसांत कंपनीऐवजी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.

पोलीस आणि महसूल विभागाच्या यंत्रणा पाठराखण करीत असल्याने कंपनी महिनाभरापासून  खारफुटीची तोड करीत असल्याचा आरोप उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केला. तालुक्यातील प्रशासन गाफील राहत असल्याने येथे असलेल्या ओएनजीसी, जेएनपीटी व भारत पेट्रोलियमसारख्या अतिसंवेदनशील प्रकल्पांचीही सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. सर्वसामान्य मच्छीमार, पयार्वरणाच्या सुरक्षेसाठी संस्थेने उरणच्या तहसीलदारांच्या विरोधात उच्च न्यायालयात व हरित लवादाकडे दाद मागण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

मच्छीमारांनाही फटका

किनाऱ्यावरची खारफुटी समुद्रात ओढून नेण्यात येत असल्यामुळे मच्छीमारांच्या जाळ्यांचेही नुकसान झाले आहे. याबद्दल तक्रार करूनही सरकारी यंत्रणा दाद देत नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. बंदर उभारणीसाठी कंपनीने किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात भराव केला असून तेथील जैवविविधतेलाही धोका निर्माण झाल्याचा आरोप होत आहे.

मिळालेल्या चित्रफितीच्या आधारे एका व्यक्तीविरोधात संशयित म्हणून तक्रार करण्यात आली. पोलीस त्याची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.  – भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार उरण

खारफुटी तोडप्रकरणी संशयित व्यक्तीची ओळख पटली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल.  – रवींद्र बुधवंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mangrove forest for port construction slaughter akp

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या