एस्सेल वर्ल्डलगत मातीचा भराव टाकून अतिक्रमण; कंपनीकडे संशयाची सुई

मुंबईतील गोराई गावात एस्सेल वल्र्ड मनोरंजन पार्कला लागून असलेल्या कांदळवनांवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कांदळवनांभोवती हिरवे प्लॅस्टिकचे कापड लावून ते बाहेरून झाकण्याचा प्रयत्नही केला गेला आहे. गोराई येथील एस्सेल वर्ल्डच्या (पॅन इंडिया पर्यटन प्रा. लि.) जागेलगतच त्यांच्या पॅन इंडिया पर्यटन प्रा. लि. या कंपनीमार्फत रिसॉर्टचे काम सुरू करण्यात येत असल्याचे बोलले जात असून त्यासाठीच ही कांदळवने तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. एस्सेल वर्ल्डकडून मात्र हे वृत्त निराधार असल्याचा दावा करण्यात आला.

मुंबईतील खुल्या जमिनी संपुष्टात आल्याने आता भूमाफिया व बांधकाम व्यवसायिकांनी आपला मोर्चा कांदळवनांकडे वळवल्याचे दिसते आहे. मुंबई उपनगरात सध्या अनेक ठिकाणी कांदळवनांवर अतिक्रमणे झाल्याची प्रकरणे पुढे येत असून कांदळवनांना संपविण्यासाठी अनेक प्रकारच्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. गोराई येथे एस्सेल वर्ल्डच्या लगतच जमिनीवर भराव टाकून कांदळवनांमध्ये मार्ग तयार करण्यात आला आहे. तसेच कांदळवनांभोवती हिरवे कापड बांधून प्रकल्पाचे काम सुरू आहे.

या कांदळवनांवर अतिक्रमण केल्याबद्दल २०१५ सालीच एस्सेल वर्ल्डविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. तसेच दोन ते तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या कांदळवन संरक्षण विभागाने देखील सरकारला दिलेल्या एका गोपनीय अहवालात या कंपनीकडून कांदळवनांवर अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे सध्याही सुरू असलेले अतिक्रमण देखील याच कंपनीमार्फत होत असल्याची शंका व्यक्त होत आहे.

दरम्यान, पर्यावरणवादी सुनिश कुंजू यांनी पोलिसांकडे आणि कांदळवन संरक्षक विभाग तसेच मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या अतिक्रमणाबाबत तक्रार केली असून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर, कांदळवनांवर अतिक्रमण केल्याबद्दल एस्सेल वर्ल्डविरोधात यापूर्वी व आताही तक्रार दाखल केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते हरीश पांडे यांनी सांगितले. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. अखेर आम्हाला पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात जावे लागेल, असा इशाराही पांडे यांनी दिला.

पाहणी करून निर्णय

कांदळवनांवर अतिक्रमण केल्याबद्दल एस्सेल वर्ल्डवर या पूर्वीही गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी पुन्हा अतिक्रमण केले असल्यास आमचे कर्मचारी जाऊन याची पाहणी करतील व त्यानंतर याबाबत ठोस माहिती देता येईल, असे उपनगरचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी स्पष्ट केले. तर, ही खासगी जागा असल्याने याचे नियंत्रण आमच्या हातात येत नसून ते जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. त्यांनी सहकार्य मागितल्यास आम्ही निश्चितच सहकार्य करू, असे कांदळवन संरक्षण विभागाचे प्रमुख एन. वासुदेवन यांनी स्पष्ट केले.

एस्सेल वर्ल्डला आरोप अमान्य

कांदळवनांवर मोठय़ा प्रमाणात भराव टाकून पाणथळ जागा बुजवल्याचा आरोप आमच्या पॅन इंडिया पर्यटन कंपनीवर करण्यात येत असून तो निराधार आहे, असे  पॅन इंडिया पर्यटन कंपनीचे प्रवक्ते चिंतक पटेल यांनी ‘लोकसत्ता’कडे केलेल्या खुलाशात स्पष्ट केले. ‘आम्ही येथे मुंबई महानगरपालिकेच्या निर्देशांप्रमाणे १९८८-८९ पासून पर्जन्य जलसंधारणाचे काम करतो आहोत. तसेच ‘अ‍ॅम्युझमेंट पार्क’साठी परवानगी देताना महापालिकेने आमच्या पाणीपुरवठय़ाची आणि संसाधनांची व्यवस्था करण्याची अट आम्हाला घातली होती. त्यासाठी आम्ही जलसंधारण करत आहोत. त्यामुळे येथील जमीन ही केवळ जलसंधारणासाठी वापरली जात असून त्याचा कांदळवनांवरील अतिक्रमणासाठी वापर करण्यात आलेला नाही. तसेच, सध्याच्या रिसॉर्टच्या जागेत कोणत्याही प्रकारची कांदळवने नाहीत. आमच्या जागेचे एक टोक खूप लांब असून तेथे सुरक्षा नसल्याने अनेकजण येथे घुसून नको ते उद्योग करत असतात. पूर्वग्रहदूषित दृष्टीने आम्ही येथे अतिक्रमण केल्याच्या खोटय़ा बातम्या पसरविल्या जात आहेत, असे पटेल यांनी स्पष्ट केले आहे.